वार्ताहर /लाटंबार्से
डिचोली तालुक्मयातील भटवाडी-नानोडा येथील लक्ष्मी नारायण मंदिरात काल दि. 20 रोजी पहाटे चोरीचा प्रकार घडला. अज्ञात चोरटय़ांनी लक्ष्मी नारायण मंदिरात प्रवेश करून फंडफेटी फोडली व सुमारे 25 हजार रुपये लंपास केले. ती फंडपेटी देवस्थानच्या पाठीमागे फेकून दिली. या घटनेची डिचोली पोलिसांत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सदर चोरीचा प्रकार काल पहाटे घडला. देवस्थानचे पुजारी जेव्हा मंदिरात नियमित पूजा करण्यासाठी आले असता मंदिरात चोरी झाल्याचा प्रकार त्यांच्या प्रथम लक्षात आला. त्वरित चोरीचा प्रकार त्यांनी तेथील ग्रामस्थांना सांगितला. त्यानंतर ग्रामस्थांनी डिचोली पोलिस स्थानकात रितसर तक्रार केली असून पोलिस आपल्या फौजफाटय़ासह श्वानपथक सोबत घेऊन घटनास्थळी दाखल झाले. व चोरी झालेल्या जागेचा पंचनामा केला. डिचोली पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक सूरज गावस यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी उपनिरीक्षक प्रसाद पाळणी अधिक तपास करीत आहेत. आतापर्यंत गावात कधीच चोरी झाली नाही. प्रथमच असा प्रकार घडला, अशी प्रतिक्रया पंच दिलीप वरक यांनी दिली.









