खिडकीचे गज वाकवून दुकानात प्रवेश : 16 लाखांचे साहित्य चोरट्यांनी पळविले
बेळगाव : जुने बेळगाव बी. एस. येडियुराप्पा मार्गावरील एका हार्डवेअर दुकानात चोरी झाली आहे. चोरट्यांनी सुमारे 16 लाखांचा ऐवज पळविला असून 8 दिवसांपूर्वी ही घटना घडली आहे. रविवारी शहापूर पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पंचमुखी ट्रेडर्स या दुकानाच्या पाठीमागच्या खिडकीचे गज वाकवून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला आहे. दुकानातील शॉवर, मिक्सर, कॉक, अँगल आदी सुमारे 1200 वस्तू पळविण्यात आल्या असून दुकानातून बाहेर पडताना पाठीमागचा दरवाजा उघडून चोरटे बाहेर पडल्याचे दिसून आले आहे. यासंबंधी उमेश रत्नकांत तुपशेट्टी (रा. हट्टीहोळ गल्ली शहापूर) यांनी रविवारी शहापूर पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. नेहमीप्रमाणे शनिवार दि. 18 नोव्हेंबर रोजी रात्री दुकान बंद करून कुलूप लावण्यात आला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी दुकान उघडण्यासाठी आले असता समोरील दरवाजा व त्याला लावलेले कुलूप तसेच होते.
रविवारी पोलिसात फिर्याद
दुकान मालकाने दरवाजा उघडून दुकानात प्रवेश केला असता पाठीमागचा दरवाजा उघडा दिसला. याचवेळी पाठीमागच्या खिडकीचे गज वाकवल्याचे त्यांच्या लक्षात आले. या बरोबरच बॉक्समध्ये ठेवलेले हार्डवेअरचे साहित्य चोरीस गेल्याचे आढळून आले. मात्र, नेमक्या किती वस्तू चोरीला गेल्या आहेत, याची पडताळणी रविवारी पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. चोरट्यांनी या दुकानातील 15 लाख 71 हजारहून अधिक किमतीचे साहित्य पळविले आहे. घटनेची माहिती समजताच शहापूरचे पोलीस निरीक्षक एस. एस. सिमानी, रुद्राप्पा सनदी व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. चोरट्यांचा माग काढण्यासाठी श्वानपथक व ठसेतज्ञांना पाचारण करण्यात आले. या घटनेला आठ दिवस उलटल्याने त्याचा उपयोग झाला नाही. शहापूर पोलीस पुढील तपास करीत आहेत.









