सातारा :
येथील प्रतिष्ठीत व्यापारी राजन मामणिया यांचा विश्वम नावाचा बंगला करंजे येथे असून अज्ञात चोरट्याने बंगल्यात शिरुन सुमारे 9 लाख 80 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. 3 ऑगस्टच्या रात्री 9 वाजता ही घटना उघडकीस आली. या चोरीच्या घटनेने खळबळ उडाली आहे.
याबाबत शाहुपुरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, राजन मामणिया यांचा बंगला राजतारा हॉटेलच्या मागे आहे. त्या बंगल्यामध्ये अज्ञात चोरट्याने शिरुन पहिल्या मजल्यावरील बाल्कनीच्या दरवाजाचे लॉक तोडून चौकट कापून बेडरुममधील लॉकरमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने आणि पैसे असा सुमारे 9 लाख 80 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला आहे. त्यामध्ये 3 लाख 80 हजार रुपयांची रोख रक्कम, 40 हजार रुपयांचे दोन जोड हिऱ्याची कर्णफुले, 40 हजार रुपयांचे एक जोड हिऱ्याचे गळ्यातील पदक, 90 हजार रुपयांच्या तीन तोळयाच्या तीन सोन्याच्या चेन, 20 हजार रुपयांचे दोन सोन्याचे कानातील जोड, 10 हजार रुपयांचे सोन्याचे पदक, 70 हजार रुपयांची हिऱ्याची कर्णफुले, 50 हजार रुपयांचा 50 ग्रॅम 730 मिली वजनाचा सोन्याचा तुकडा, 25 हजार रुपयांचे 2 तोळयाचे 4 सोन्याचे कॉईन, अर्धा तोळ्याचे 4 सोन्याचे क्वाईन, तळमजल्यावरील स्टुडिओतील कपाटात ड्रॉव्हरमध्ये ठेवलेला 25 हजार रुपयांचा अडीच तोळे वजनाचा राणी हार, 10 हजार रुपयांचे 1 तोळे वजनाचे लॉकेट, 20 हजार रुपयाची हिऱ्याची कर्णफुले, 1 लाख 50 हजार रुपयांच्या पाच तोळे वजनाच्या सोन्याच्या बांगडया, 20 हजार रुपयांच्या सोन्याच्या दोन तोळ्याच्या कानातील फुलांचे नक्षीदार लॉकेट, 1 तोळे वजनाची सोन्याची चेन, 20 हजार रुपये रोख असा ऐवज चोरुन नेला आहे. घटनास्थळी सातारचे डीवायएसपी राजीव नवले यांनी भेट दिली असून याचा तपास पोलीस उपनिरीक्षक ढमाळ हे तपास करत आहेत.








