आज पुन्हा होणार शोधकार्य सुरू राहणार
वार्ताहर / कास
शिवसागर जलाशयात म्हावशी (ता. जावळी) हद्दीमध्ये मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास शिवसागर जलाशयात बुडालेल्या संकेत काळेचा मृतदेह बुधवारी दिवसभर शोधकार्य चालवूनही सापडला नसल्याने गुरूवारी सकाळी पुन्हा शोध घेतला जाणार आहे.
संकेत संग्राम काळे (वय 27 वर्ष रा. रेठरे वाठार ता. कराड) हा आपल्या मित्रांसह म्हावशी येथे पर्यटनासाठी आले होते. एका झाडाखाली स्वंयपाकाचे साहित्य मांडून नदीच्या किनारी सर्वजन बसले होते. सायंकाळी सातच्या सुमारास संकेत पोहण्यासाठी गेल्याचे त्याचे मित्र सांगत आहेत.
तरीही हा युवक नेमका खोल पाण्यात आतपर्यंत कसा बुडाला याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. बुधवारी शिवेंद्रराजे ट्रेकर्स भैरवनाथ बोट क्लबचे कर्मचारी व परिसरातील ग्रामस्थांनी बोटी व गळाच्या साहाय्याने दिवसभर शोधकार्य राबविले. पण संकेतचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही. त्याचा मृतदेह अद्याप बेपत्ता आहे. त्यांच्या वडिलांसह नातेवाईक मित्र मंडळी घटनास्थळी दाखल झाले असुन शोध घेत आहेत.
घटनेबाबत उलटसुलट चर्चा…
हा युवक नेमका कसा बुडाला याबाबत उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. काही लोकांच्या म्हणण्यानुसार सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास हा युवक पाण्यात पोहायला गेला आणि बुडाला असे सांगितले जात आहे तर काही जण सदर घटनास्थळ परिसरात एक टेंट हाऊस असून या टेंट हाऊसवर हे पर्यटक आले होते. टेंट हाऊसवर असलेल्या वॉटर स्कूटर बोटवरून पाण्यात सैर करताना स्कूटर बोट पलटी होऊन हा युवक पाण्यात बुडाला असे बोलले जात आहे. त्यामुळे या घटनेच्या मुळाशी जाऊन निःपक्षपातीपणे शोध घेण्याचे आवाहन पोलीस प्रशासनासमोर आहे.
मृतदेह हाती येताच कशामुळे मृत्यू झाला याचा खुलासा होणार
पाण्यात बुडालेला मृतदेह शक्यतो तिसऱया दिवशी बाहेर येतो त्यामुळे आज मृतदेह बाहेर येण्याची शक्यता असुन पोहण्यासाठी गेला असेल तर कपडे अंगावर नसतील आणि स्पीड बोट किंवा अन्य कोणत्याही कारणाने बुडाला असल्यास त्यांच्या सोबत कपडे असतील अशी जाणकारांमध्ये चर्चा रंगली असुन मृतदेह सर्वप्रथम कोणीही हात न लावता प्रशासनाच्या निर्देशनास आला पाहिजे त्यासाठी पोलीस प्रशासन घटनास्थळी असणे आणि प्रथमदर्शनी व पोलिसांची भूमिका म्हत्वाची ठरणार आहे.








