आमदार असीफ सेठ यांचे प्रतिपादन : जिल्हा प्रशासनातर्फे वीरसौध येथे महात्मा गांधी-लालबहादूर शास्त्री जयंती साजरी
बेळगाव : जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, माहिती व प्रसारण खाते, महानगरपालिका, शिक्षण खाते आणि विविध पदवी-पदव्युत्तर शिक्षण संस्थांतर्फे महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री जयंती वीरसौध येथे साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार असीफ सेठ उपस्थित होते. यावेळी ते म्हणाले, रामराज्य केवळ गांधींच्या तत्त्वांचे आचरण करूनच शक्य होणार आहे. आजच्या युवकांनी गांधींच्या तत्त्वांचा तसेच लालबहाद्दूर शास्त्री यांच्या कर्तव्यनिष्ठेचे अनुकरण करावे, यासाठी या दोघांच्याही चरित्रांचे वाचन करावे. महात्मा गांधी यांनी अहिंसेचा मार्ग दाखविला. त्याचा आपण अंगिकार करावा, असे सांगितले. गांधीजींनी आपल्याला साधेपणा आणि सामाजिक तत्त्वांचा वस्तुपाठ घालून दिला आहे. त्याचे आचरण करावे, असे विधान परिषद सदस्य नागराज यादव यांनी सांगितले. गांधी तत्त्वज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी गांधी अभ्यास केंद्र स्थापन करावे यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न करू, असे ते म्हणाले.
महात्मा गांधी जयंती केवळ एका दिवसापुरती नको. तसेच कोणत्याही महात्म्यांना जात, धर्म यामध्ये बंदिस्त करणेही नको. या प्रत्येकांच्या तत्त्वांचे आचरण आपण करायला हवे, असे जिल्हा पोलीसप्रमुख भीमाशंकर गुळेद यांनी सांगितले. आपल्याला शक्य नाही, अशी कोणतीही गोष्ट नसते. फक्त आपले विचार स्पष्ट हवेत आणि अहिंसेच्या मार्गाने वाटचाल करूनही यश मिळविता येते, हेच गांधीजींनी आपल्याला शिकविले, असे जि. पं. चे सीईओ हर्षल भोयर यांनी सांगितले. माहिती व प्रसारण खात्याचे उपसंचालक गुरुनाथ कडबूर यांनी गांधीजी केवळ भारतासाठीच नव्हे तर जगाला आदर्श आहेत, असे सांगितले. तत्पूर्वी आरसीयुचे प्रा. गंगाधरय्या यांचे गांधीजींवर व्याख्यान झाले. यानंतर गांधीजी या विषयावर घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण पार पडले. विनायक मोरे यांनी भजन सादर केले. याप्रसंगी उपमहापौर रेश्मा पाटील, डीसीपी रोहन जगदीश, मनपाच्या अधिकारी भाग्यश्री हुग्गी, स्मार्ट सिटीच्या लक्ष्मी निपाणीकर, अन्न व नागरी पुरवठा खात्याचे श्रीशैल कंकणवाडी, सामाजिक कल्याण खात्याचे लक्ष्मण बाबली, स्मार्ट सिटीचे संचालक आफ्रिनबानू बळ्ळारी, स्वा. सै. राजेंद्र कलघटगी, सामाजिक कार्यकर्ते मल्लेश चौगुले आदी उपस्थित होते. निवासी जिल्हाधिकारी विजयकुमार व्हनकेरी यांनी स्वागत केले. सर्वमंगला अरळीमट्टी यांनी सूत्रसंचालन केले.









