सायकलवरून 64 किल्ल्यांना भेटी : 5 हजार कि.मी. प्रवास
बेळगाव : छत्रपती शिवरायांनी उभारलेल्या किल्ल्यांना भेटी देऊन त्याबाबत युवा पिढीला माहिती देण्याच्या हेतूने उत्तराखंड येथील कार्तिक सिंग या तरुणाने सायकलवरून प्रवास सुरू केला आहे. गेल्या 132 दिवसांपासून त्याचा प्रवास सुरू असून आजपर्यंत त्याने 64 किल्ल्यांना भेट दिली आहे. तसेच 5 हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला आहे. कार्तिकने पुणे, सातारा, नाशिक, कोल्हापूर, चंदगड असा प्रवास करत गुरुवारी तो बेळगावमध्ये दाखल झाला. लवकरच रायगड किल्ला सर करण्याचा त्याचा मनोदय असून 6 जून रोजी रायगडावर होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यात सहभागी होण्याची इच्छा त्याने व्यक्त केली.
या भेटीबद्दल कार्तिक म्हणतो, साधारण जेथे नागरी वसाहत आहे तेथील किल्ल्यांचे अस्तित्व हळूहळू लयाला जात आहे. परंतु हे किल्ले म्हणजे आपल्या ऐतिहासिक वैभवाचे वारसदार आहेत. त्यामुळे त्यांचे संवर्धन करणे ही आपली जबाबदारी आहे. छत्रपती शिवराय व धर्मवीर संभाजी महाराज हे माझे प्रेरणास्थान असून संभाजी महाराजांची 8 फुटांची मूर्ती आपण तयार करणार आहोत. शिवाय प्रत्येक गड-किल्ल्यावरील माती संग्रहीत करून त्यासाठी पुन्हा दुचाकीने प्रवास करणार आहे. बेळगाव येथे आल्यावर श्रीराम सेना हिंदुस्थानतर्फे त्याचे स्वागत केले. यावेळी नरू निलजकर, अभिषेक कुऱ्हाडे व अवधुत तुडवेकर आदी उपस्थित होते.









