मच्छेनजीक अशोक आयर्न कारखान्याजवळ अपघात
प्रतिनिधी/ बेळगाव
भरधाव कँटरने मोटारसायकलला ठोकरल्यामुळे किरहलशी (ता. खानापूर) येथील एक युवक जागीच ठार झाला. शुक्रवार दि. 31 जानेवारी रोजी सायंकाळी मच्छे येथील अशोक आयर्नजवळ हा अपघात घडला. जोतिबा पुंडलिक पाटील (वय 32) रा. किरहलशी असे त्याचे नाव आहे. शुक्रवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास एमएच 09 सीयु 5477 क्रमांकाच्या कँटरने मोटारसायकलला ठोकरल्यामुळे तो जागीच ठार झाला. घटनेची माहिती समजताच बेळगाव ग्रामीणच्या पोलीस उपनिरीक्षक श्वेता व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मोटारसायकलवरून नातेवाईकांच्या घरी जाताना ही घटना घडल्याचे सांगण्यात आले. सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.









