ठिकठिकाणी रंगोत्सवाचे आयोजन : दुपारपर्यंत जल्लोष अन् उत्साह

बेळगाव ; ‘बुरा ना मानो, होली है’ असे म्हणत बेळगाव शहर व उपनगरांमध्ये मंगळवारी रंगोत्सव साजरा करण्यात आला. डीजेवर तरुणाई बेभान होऊन थिरकली. अलिकडे केवळ शहराच्या मध्यवर्ती भागातच नव्हे तर उपनगरांमध्ये सुद्धा रंगोत्सव जल्लोषात साजरा झाला. काही ठिकाणी रंगोत्सवाचे खास आयोजन केले होते. तर यंदा गल्लोगल्लीसुद्धा युवक मंडळांनी रंगोत्सवासाठी विशेष तयारी केल्याचे दिसून आले. सोमवारी सायंकाळनंतर होळी कामाण्णा मंदिरांमध्ये पोळीचा नैवेद्य दाखवून श्रीफळ अर्पण करण्यात आले. रात्री उशिरानंतर होळीचे दहन करण्यात आले. रंगपंचमीसाठी मागील आठवडाभरापासून बाजारपेठ सजली होती. पिचकाऱ्या, विविध प्रकारचे रंग, फुगे, मुखवटे यांची विक्री जोरात होती. मंगळवारी सकाळपासूनच बालचमूंनी रंगाची उधळण सुरू केली.
काही ठिकाणी डीजेचे सेट उभारण्यात येत होते. सकाळी 10 नंतर रंगपंचमीला सुऊवात झाली. ळगाव शहराबरोबरच उपनगरांमध्येही रंगपंचमीचा उत्साह दिसून आला. टिळकवाडी, उद्यमबाग, अनगोळ, चन्नम्मानगर, मच्छे, जुनेबेळगाव, नेहऊनगर, सदाशिवनगर, शिवाजीनगर, गांधीनगर, महांतेशनगर, कॅम्प या परिसरात ठिकठिकाणी रंगाची उधळण सुरू होती. युवा वर्गासोबत महिलाही डीजेच्या तालावर थिरकत होत्या. एकमेकांना रंग लावत ऊसवे फुगवे बाजुला सारत एक नवी सुऊवात या निमित्ताने करण्यात येत होती. समाजमाध्यमांवर होळी व रंगपंचमीच्या शुभेच्छांचे वर्षावर सुरू होते.
अश्वत्थामा मंदिरात पारंपरिक पद्धतीने लोटांगण

दक्षिण भारतातील एकमेव अश्वत्थामाचे मंदिर पांगूळ गल्ली येथे आहे. दरवर्षी रंगपंचमीच्या दिवशी मंदिरासमोर लोटांगण घातले जाते. आपल्या मनात असणाऱ्या मागण्या पूर्ण करण्यासाठी देवासमोर लोटांगण घालून गाऱ्हाणे घातले जाते. पारंपरिक पद्धतीने सोमवारी रात्री होळीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर अश्वत्थामाला अभिषेक करण्यात आला. मंगळवारी सकाळपासून दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. बेळगावसह परिसरातील शेकडो भाविक लोटांगण घालण्यासाठी मंदिर परिसरात दाखल झाले होते. दुपारी 1.30 नंतर लोटांगण घालण्यात आले. 10 ते 12 हजार भाविकांच्या उपस्थितीत लोटांगणाचा कार्यक्रम पार पडला. आज प्रत्येक सणाचा इव्हेंट झाला आहे. होळी व रंगपंचमी आपल्या मित्र मैत्रिणींसोबत साजरी करण्यासाठी हॉटेल बुक केली जात आहेत. शहर व परिसरातील काही हॉटेलमध्ये रंगपंचमीचा इव्हेंट आयोजित केला होता. मोजक्याच नागरिकांच्या उपस्थितीत रंगोत्सवाचा आनंद घेता यावा यासाठी बऱ्याच जणांनी अशा प्रकारे हॉटेलवर जाऊन रंगोत्सवाचा आनंद घेतला.
रेन डान्सवर तरुणाई थिरकली

मोठ्या खुल्या जागांवर रंगोत्सवाचे आयोजन केले जात असले तरी आपल्या गल्लीमध्ये सर्व नागरिकांसोबत रंगपंचमी साजरी करण्यासाठी रेन डान्सचे आयोजन केले जात आहे. शहर व उपनगरातील बऱ्याचशा भागामध्ये शॉवर लावून पाण्याचे फवारे सोडण्यात आले होते. डीजेच्या दणदणाटात तऊणाई बेभान होऊन रंगांमध्ये न्हाऊन निघत होती. खडक गल्ली, गोंधळी गल्ली, गवळी गल्ली, चव्हाट गल्ली, पांगूळ गल्ली, मेणसी गल्ली या परिसरात अशा रेन डान्सवर तरुणाईचा डान्स सुरू होता.
रसायनयुक्त रंगामुळे डोळ्यांना इजा
दरवर्षी नवीन नवीन रंग बाजारात आणले जातात. शरीरावरून न जाणाऱ्या रंगांना सर्वाधिक मागणी होती. यावर्षी अनेक नवीन रंग बाजारात दाखल झाले होते. यातील बरेचसे रंग डोळ्यामध्ये गेल्याने नागरिकांना इजा पोहोचली आहे. रंगपंचमीनंतर अनेकजण नेत्रतज्ञांकडे जाऊन तपासणी करून घेत होते. यामुळे या रसायनयुक्त रंगामुळे मोठ्याप्रमाणात डोळ्यांना इजा झाल्याचे दिसून आले.
हौस पूर्ण पण विकृतीचे काय?
रंगपंचमी वर्षातून एकदाच येत असल्यामुळे हौसेखातर तरुणाईचा जल्लोष सुरू असतो. परंतु ही हौस विकृतीकडे घेऊन जाणारी आहे का? असाही प्रश्न वडीलधाऱ्यांमधून विचारला जात आहे. रंगपंचमी दिवशी सुरू असणारे हिडिस प्रकार त्यात यावर्षी युवतीही मागे नव्हत्या. अंगावरील कपडे काढून शहरभर वेगाने ट्रीपल सीट गाड्या फिरवणे कपडे काढून विद्युत वाहिन्यांवर टाकणे, मुक्या प्राण्यांवर कलर टाकणे, महिलांचे कपडे परिधान करून बिभत्स नृत्य करणे असे प्रकार मंगळवारी दृष्टीस पडत होते. त्यातच काही जणांनी तर पेटत्या होळीमध्ये कचरा व फाटके कपडे टाकणे असे प्रकार केल्याने होळीचे धार्मिक स्वऊप जपले जात आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.









