ऑफिसमध्ये झोपते, स्नानासाठी पोहोचते जिममध्ये
भारताच्या अनेक शहरांमध्ये घरभाडे इतके अधिक वाढले आहे की लोक छोट्या घरांचे भाडेही भरू शकत नाहीत. भारतात ही स्थिती असेल तर विदेशात काय घडत असेल याचा विचार करा. केवळ घराच्या वाढत्या भाड्यामुळे त्रस्त होत एका युवतीने बचतीची अजब पद्धत शोधली आहे. ही युवती स्वत:हून बेघर झाली, जेणेकरून घरभाडे भरायला लागू नये. आता ही युवती ऑफिसमध्ये झोपी जाते आणि स्नानासाठी जिममध्ये पोहोचते.
डेस्टिनी ही ब्रिटनची रहिवासी आहे. टिकटॉकवर तिचे 17 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. अलिकडेच तिने एक व्हिडिओ पोस्ट केला ज्यात तिने स्वत:च्या आयुष्याविषयी खुलासा केला. प्रत्यक्षात डेस्टिनी बेघर असून ती ऑफिसच्या एका केबिनमध्ये रात्री वास्तव्य करते आणि स्नानासाठी जिमला जाते.
दर महिन्याला घरभाडे अन् अन्य कारणांकरता ती 1.7 लाख रुपये खर्च करत होती. यामुळे तिची बचत होत नव्हती. या कारणामुळे त्रस्त होत ती स्वमर्जीने बेघर झाली. प्रारंभी ती बहुतांश काळ स्वत:च्या कारमध्ये राहायची. परंतु वारा अन् उष्णतेच्या समस्येमुळे तेथेही तिला त्रास होऊ लागला. मग तिने स्वत:च्या मॅनेजरशी याबद्दल बोलण्याचा निर्णय घेतला.
मॅनेजरकडून परवानगी घेत ती ऑफिसच्या एका छोट्या केबिनमध्ये झोपू लागली. केबिनमध्ये एक रिक्लाइनर चेअर होती, ज्यावर ती झोपायची. तर सकाळी स्नान आणि इतर कामांसाठी तिने जिमची मेम्बरशिप घेतली आहे. याकरता तिला 1600 रुपये खर्च येतो. ऑनलाइन शॉपिंगसाठी ती कंपनीच्या पिक-अप लोकेनशवर सामग्री मागविते. ऑफिसमध्ये तिचा मायक्रोवेव अन् फ्रीज आहे. फ्रिजमध्ये खाद्यपदार्थ ठेवून ते मायक्रोवेवमध्ये गरम करत ती खात असते.









