मुनवळ्ळी येथील प्रकाराने खळबळ : तपासाचे आव्हान
बेळगाव : अनोळखी तरुणाचा खून करून पुरावे नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह पोत्यात बांधून मलप्रभा नदीवरील पुलाखाली टाकून देण्यात आला आहे. मुनवळ्ळी, (ता. सौंदत्ती) येथे हा प्रकार उघडकीस आला असून खून झालेल्या तरुणाची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सौंदत्ती पोलिसांनी सुमारे 18 ते 22 वर्षीय अनोळखी तरुणाचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. गळा दाबून किंवा त्याच्या डोक्यावर हल्ला करून खून केल्याचा संशय आहे. हातपाय बांधून त्या तरुणाचा मृतदेह पोत्यात घालून मुनवळ्ळीजवळील मलप्रभा नदीवरील पुलाखाली टाकण्यात आला होता. विठ्ठल रंगप्पा नरीतली, रा. मुनवळ्ळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सौंदत्ती पोलीस स्थानकात भादंवि 302, 201 कलमान्वये बुधवारी 15 नोव्हेंबर रोजी रात्री एफआयआर दाखल करण्यात आला आहे. 5 फूट 6 इंच उंची, गोल चेहरा, लालसर वर्ण असे त्या तरुणाचे वर्णन आहे. त्याने आपल्या अंगावर निळा फुल्ल शर्ट व निळी पँट परिधान केली आहे.
‘गजा’, ‘चेतन’, ‘मॉम-डॅड’ आणि बदाम
त्या तरुणाने आपल्या हातावर कन्नडमधून ‘गजा’ व इंग्रजीमधून ‘चेतन’ असे गोंदवून घेतले आहे. मनगटावर लाल रंगातून बदामाचे चित्र, हाताच्या कोपरावर इंग्रजीमधून ‘मॉम-डॅड’ व दोन बदामाची चिन्हे गोंदवून घेतली आहेत. मृतदेह सडलेल्या अवस्थेत असून आता गोंदलेल्या चिन्हांवरूनच त्याची ओळख पटविण्यात येत आहे. संबंधितांनी 9480804039 या क्रमांकावर सौंदत्ती पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.