विषारी साप चावल्यास माणसाचा अंत होऊ शकतो, ही बाब स्पष्टच आहे. तथापि, मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातल्या खुडसोडी नामक ग्रामात अशी एक विचित्र घटना घडली आहे, की जी आज बहुचर्चित झाली आहे. साऱ्यांनाच आश्चर्यचकित करणारी ही घटना आहे. या ग्रामी 19 जून 2025 या दिवशी ही घटना घडली. या ग्रामातील सचिन नागपुरे नामक युवकाला एक साप चावला. त्यानंतर पाचच मिनिटांमध्ये त्या सापाचाच अक्षरश: तडफडून अंत झाला.
सचिन नागपुरे हा 25 वर्षे वयाचा युवक आहे. तो आपल्या शेतात सकाळी साडेसहालाच कामासाठी गेला होता. काम करताना न कळत त्याचा पाय एका विषारी सापावर पडला. सापाने पटकन् पलटी मारुन त्याला दंश केला. आता या युवकाचे काय होणार हा प्रश्न त्याच्या सहकाऱ्यांना पडला होता. ते अत्यंत चिंतेत पडले होते. तथापि, हा विषारी साप चावल्यानंतरही सचिन नागपुरे सुरक्षित राहिला आणि तो सापच दोन-तीन मिनिटांमध्ये तडफडू लागला. पाच ते सहा मिनिटांमध्ये त्याचा अंत झाला. असे कसे घडले, यावर आता खल होत आहे. नागपुरे याचे म्हणणे असे आहे, ती तो प्रतिदिन कडूलिंब, करंजा, जांभूळ, पिसुंडी आदी झाडांच्या काड्या दंतमंजन करण्यासाठी उपयोगात आणतो. या कारणामुळे त्याचे रक्त सापाच्या विषाला मारक अशा प्रकारचे बनले आहे. इतकेच नव्हे, तर असे रक्त सापाच्या शरिरात शिरल्यास सापाचाच अंत होतो. त्याचे कुटुंबियही असेच प्रतिपादन करत आहेत. तथापि, तज्ञ त्यांचे म्हणणे मान्य करत नाहीत.
तज्ञांच्या म्हणण्यानुसार हा एक दुर्लभ आणि असामान्य प्रकार आहे. साप चावल्यानंतर उलटा फिरतो आणि विषाचे दात चावलेल्याच्या शरीरातून सोडवून घेतो. असे करताना त्याच्या विषाची पिशवी फाटली असावी आणि आपलेच वीष पोटात जाऊन सापाचा अंत झाला असावा. साप चावल्यानंतर त्याचे वीष अत्यल्प प्रमाणात या युवकाच्या रक्तात मिसळले असावे आणि त्यामुळे तो विशेष त्रास न होता वाचला असावा. तथापि, स्थानिकांना तज्ञांचे म्हणणे पटलेले नाही. ते हा प्रकार नागपुरे याच्या अंतर्गत शक्तीच्या माध्यमातून घडल्याचे मानतात. यात काय खरे आणि काय खोटे हा संशोधनाचा विषय असून ते केले जात आहे.









