वार्ताहर /सांबरा
बसरीकट्टी येथे गेल्या नऊ दिवसांपासून सुरू असलेल्या श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेची बुधवारी उत्साहात सांगता झाली. दरम्यान यात्रेच्या सांगताप्रसंगी परिसरातील हजारो भाविकांची उपस्थिती होती. त्यामुळे अवघा परिसर भाविकांनी फुलून गेला होता. मंगळवार दि. 13 पासून श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेला प्रारंभ झाला होता. नऊ दिवस चाललेल्या यात्रेमध्ये हजारो भाविकांनी श्री देवीच्या दर्शनाचा लाभ घेतला. बुधवारी सकाळी मंडपामध्ये गावातील ज्येष्ठ नागरिक, यात्रेसाठी झटलेले कार्यकर्ते व पंचमंडळींचा यात्रा कमिटीच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यानंतर सायंकाळी श्री महालक्ष्मी देवीची विधिवत पूजा करण्यात आली व श्री महालक्ष्मी देवीला गावच्या सीमेकडे नेण्यात आले. हा सोहळा पाहण्यासाठी परिसरातील हजारो भाविकांनी यावेळी मोठी गर्दी केली होती. भंडाऱ्याची उधळण व श्री देवीचा जयघोष करत भाविकांनी यात्रेच्या सांगताप्रसंगी भाग घेतला होता. शेवटी श्री महालक्ष्मी देवीला सीमेला पोहोचवल्यानंतर उत्सवाची सांगता झाली.









