मसूर :
आजकालच्या धावपळीच्या युगात शेजारी काय चालले आहे हे बघायला लोकांना वेळ नसतो. तर रस्त्यातून जाता-येता एखादा अपघात झाला असला तर त्याकडे दुर्लक्ष करून प्रत्येक जण हळहळ व्यक्त करत निघून जात असतो. मात्र जखमींना साधी मदत करण्याचे धाडसही कोणी करत नाही. अशावेळी कराड तालुक्यातील कवठे येथील यादव कुटुंबीयांनी एका जखमी पक्ष्याला दिलेले जीवदान खरोखरच माणुसकी जपण्यासारखेच आहे.
दोन दिवसांपूर्वी कवठे येथील सामाजिक कार्यकर्ते रवींद्र हणमंत यादव यांच्या घरामागे शेवग्याच्या झाडावर जखमी पक्षी आढळला. घरातील सदस्यांनी इंटरनेटवरून तो गरुडच असल्याची खातरजमा केली. त्याच्या पंखाला इजा झाल्याने व त्यास उडता येत नसल्याने फांदीवर बसून होता. तनिष्का रवींद्र यादव हिला तो दिसला. तिने घरातील पुरुष मंडळींना खबर दिली. तिचे वडील रवींद्र यादव यांनी झाडावर चढून पक्ष्यास खाली आणले. चुलते शशिकांत यादव व कुटुंबीयांनी त्यास पाणी पाजले, खाऊ दिला. थोडीशी तरतरी आल्यानंतर तो पक्षी उडून जाण्यासाठी धडपडू लागला.
याबाबत तत्काळ वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना कळविण्यात आले. काही वेळातच वनविभागाचे कवठे बीटचे वनरक्षक रोहन माने यांच्या आदेशावरून हंगामी वनमजूर सोमनाथ पाटील व घनश्याम चव्हाण घटनास्थळी पोहोचले. यादव कुटुंबीयांनी पक्ष्याला वनविभागाच्या ताब्यात दिले. पक्ष्याप्रति यादव कुटुंबीयांनी दाखविलेल्या संवेदनशीलतेबद्दल वनविभाग कर्मचाऱ्यांनी यादव कुटुंबीयांचे अभिनंदन केले. वनरक्षक रोहन माने यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, की संबंधित पक्ष्यावर मसूर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात सुश्रुषा करण्यात आली. दोन इंजेक्शन देऊन त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर संध्याकाळी सात वाजता त्यास त्याच्या अधिवासात सोडण्यात आले.
- सोनेरी गरुड नव्हे, ती तर ब्राह्मणी घार।
यादव कुटुंबीयांच्या घरी गोल्डन ईगल म्हणजेच सोनेरी गरुड सापडल्याची वार्ता गावात पसरली. गरुडाला पाहण्यासाठी लोक येऊ लागले. त्यानंतर वनविभागाचे अधिकारी आले. कवठे बीटचे वनरक्षक रोहन माने यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, की संबंधित पक्षी हा गरुड नसून आपल्याकडे न आढळणारी ब्राह्मणी घार आहे








