ब्रिजभूषण सिंग यांच्याशी आता न्यायालयीन लढा
प्रकरण लवकर चालविण्याची मागणी
- ब्रिजभूषण सिंग यांच्याविरोधात प्रकरण लवकर चालविण्याची मागणी
- कुस्तीपटू आता पुन्हा कुस्तीच्या आखाड्यात परतण्याच्या तयारीत
- कुस्तीपटूंवरील कायदा सुव्यवस्थेचे आरोप आता मागे घेतले जाणार
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
भारतीय कुस्ती संघटनेचे माजी अध्यक्ष खासदार ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या विरोधात गेल्या दोन महिन्यांपासून करण्यात येत असलेले आंदोलन कुस्तीपटूंनी मागे घेतले आहे. त्यांच्या विरोधातील लढा आता रस्त्यावर नव्हे, तर न्यायालयात लढविला जाईल, असे प्रतिपादन या कुस्तीपटूंनी ट्विटरवरून केले आहे. या आंदोलनाचे मुख्य सूत्रधार असणारे कुस्तीपटू विनेश फोगाट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांनी त्यांच्या स्वतंत्ररित्या पोस्ट केलेल्या ट्विटर संदेशातून आंदोलन मागे घेत असल्याची माहिती दिली. जाहीर आंदोलन मागे घेण्यात आले असले तरी अन्यायाविरोधात लढा सुरुच राहणार आहे. आता तो न्यायालयाच्या माध्यमातून लढला जाईल. न्याय मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही. तसेच अन्याय करणाऱ्यांना स्वस्थ बसू देणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
आधी दिला होता इशारा
आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा या कुस्तीपटूंनी रविवारी दिला होता. तथापि, त्यानंतर एका दिवसातच आंदोलन मागे घेतल्याची घोषणा करण्यात आली. सर्व कुस्तीपटू आता सरावाच्या आखाड्यात उतरतील असे काही दिवसांपूर्वीच स्पष्ट करण्यात आले होते. त्यामुळे यापुढे जाहीर आंदोलन न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ब्रिजभूषण सिंग यांच्यावर महिला कुस्तीपटूंचे शारीरिक शोषण केल्याचा आरोप या कुस्तीपटूंनी केला होता.
न्यायालयात प्रकरण चालणार
आता दिल्लीच्या न्यायालयात सिंग यांच्याविरोधात प्रकरण चालणार आहे. एका अल्पवयीन महिला कुस्तीपटूचे शारीरिक शोषण सिंग यांनी केल्याचाही आरोप प्रथम करण्यात आला होता. तथापि, या कुस्तीपटूच्या वडिलांनीच हा आरोप न्यायालयात दुसरे प्रतिज्ञापत्र सादर करून मागे घेतला आहे. आपली मुलगी कथित घटना घडली तेव्हा अल्पवयीन नव्हती. तसेच तिचे शारीरिक शोषण झालेले नाही. तिच्या विरुद्ध पक्षपात करण्यात आला एवढीच आमची तक्रार होती, असा खुलासाही या महिला कुस्तीपटूच्या वडिलांनी एका मुलाखतीत केला होता.
दोन महिने आंदोलन
कुस्तीपटूंनी त्यांचे आंदोलन गेले दोन महिने चालविले होते. दिल्लीतील जंतरमंतर हे आंदोलनाचे स्थान होते. या आंदोलनाला खाप पंचायतींनीही पाठिंबा दिला होता. हरियाणातील शेतकरी संघटनांनी आंदोलनाचे समर्थन केले होते. प्रथम मागणी सिंग यांच्या राजीनाम्याची होती. नंतर त्यांना अटक करण्याची मागणी करण्यात आली. काही महिला कुस्तीपटूंनी सिंग यांच्या विरोधात पोलिसात तक्रार सादर केल्याने त्यांच्याविरोधात एफआयआर नोंद करण्यात आला. आता सिंग यांच्याविरोधात आरोपपत्र सादर करण्यात आले आहे. दिल्लीतील दोन न्यायालयांमध्ये ही प्रकरणे चालणार आहेत. पोक्सो कायद्याअंतर्गत प्रकरण चालविण्यासाठी कोणताही पुरावा नाही, असे म्हणणे पोलिसांनी न्यायालयात मांडले असून त्यावर न्यायालय अंतिम निर्णय घेणार असे स्पष्ट करण्यात आले.
न्यायालयातच निर्णय होईल
कुस्तीपटूंनी आंदोलन मागे घेतल्यानंतर ब्रिजभूषण शरण सिंग यांनी त्यांची प्रतिक्रिया व्यक्त करताना, आता न्यायालयातच निर्णय होईल, असे प्रतिपादन केले आहे. आपण निर्दोष असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला. आपल्याविरोधात आकस असल्याने काहींनी आरोप केले आहेत. पण न्यायालयात आपले निर्दोषत्व सिद्ध झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.









