जहाजांना काडेपेटीसारखे उचलण्याची किमया
चीनच्या गुइजहौ प्रांतात गॉपिटन शिपलिफ्ट असून ती जगातील सर्वात मोठी शिपलिफ्ट आहे. हा प्रकल्प म्हणजे उत्तम इंजिनियरिंगचा अद्भूत नमुना आहे. ही शिपलिफ्ट 500 टनापर्यंतच्या वजनाच्या जहाजांना 653 फुटांच्या उंचीपर्यंत काडेपेटीप्रमाणे उचलू शकते. चीन अशाप्रकारच्या आणखी अनेक उत्तम कन्स्ट्रक्शन्ससाठी जगभरात प्रसिद्ध आहे.
अद्भूत वैशिष्ट्यो असणारी गॉपिटन शिपलिफ्ट तयार करणे सोपे नव्हते. परंतु अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीमुळे इंजिनियर्सनी हे साध्य करून दाखविले आहे. गॉपिटन हायड्रोपॉवर स्टेशनमध्ये सामील गॉपिटन शिपलिफ्ट याचे एक उत्तम उदाहरण आहे.
ही शिपलिफ्ट 2021 मध्ये निर्माण करण्यात आली होती. याचे एकूण अंतर 2.3 किलोमीटर इतके असून यात तीन वेगवेगळ्या हायड्रोलिक लिफ्ट सामील आहेत. गुइझोउमध्ये यांग्त्जी नदीची उपनदी वू वर असलेली गॉपिटन शिपलिफ्ट जगातील तंत्रज्ञानाच्या चमत्कारांपैकी एक आहे. गॉपिटन शिपलिफ्टमुळे जलमार्गावर जहाजवाहतूक करणे सोपे ठरले आहे.
गॉपिटन शिपलिफ्ट कॉम्प्लेक्स तयार करणाऱ्या तीन लिफ्ट्सपैकी प्रत्येकीची उचलण्याची क्षमता 1800 टन इतकी आहे. तसेच उचलण्याचा वेग 8 मीटर प्रति मिनिट इतका आहे.
चांगजियांग इन्स्टीट्यूट ऑफ सर्वेने अधिक संख्येत जहाज पोहोचल्याच्या स्थितीत जोखमी कमी करण्यासाठी गॉपिटन शिपलिफ्ट सिस्टीमला तीन वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये विभाजित करण्याचा निर्णय घेतला. एक जहाज पहिल्या लिफ्टमधून पुढे निघून गेल्यास दुसरे जहाजल उचलले जाऊ शकते. तर पहिले जहाज दुसऱ्या आणि तिसऱ्या लिफ्टच्या माध्यमातून स्वत:चा प्रवास सुरू ठेवते. यापूर्वी सर्वात मोठ्या शिपलिफ्टचा विक्रम चीनच्या थ्री गोरजेस जलविद्युत परिसरात स्थित अशाच एका सिस्टीमच्या नावावर होता. ही शिपलिफ्ट गॉपिटन शिपलिफ्टपेक्षा केवळ 14 मीटरने छोटी आहे.









