समांतर पुल बांधून मला नवसंजीवनी कधी देणार : बंधाऱ्याचा सवाल
कसबा बावडा सचिन बरगे
होय, मी राजाराम बंधारा बोलतोय…..1908 साली छत्रपती राजाराम महाराजांच्या काळातला माझा जन्म. संपूर्ण दगडी बांधकाम असलेला पंचगंगा नदीवरील कसबा बावड्यातील कोल्हापूर पद्धतीचा जगातील पहिला बंधारा म्हणून माझी ओळख. दररोजची तहान भागवण्यापासून ते शेती, औद्योगिकच्या क्षेत्राच्या वापरासाठी आणि कोल्हापूरला सुजलाम-सुफलाम बनवण्यासाठी छत्रपती राजाराम महाराजांनी माझी निर्मिती केली. माझे वय तसे 115 वर्षे. या काळात मी अनेक उन्हाळे, पावसाळे बघितले. पण मी आता थकलो आहे. माझा थकवा पाहून सात वर्षापूर्वी माझ्dया शेजारी समांतर पुल बांधण्याचे काम सुऊ केले. पण आजवर या पुलाचे काम पूर्ण झालेलं नाही, याच्या मला वेदना खूप होत आहेत.
तसे पहायला गेल्यास करवीर तालुक्यातील तब्बल 15 ते 16 गावांमधील नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून राजाराम बंधाऱ्यावऊन येत करत आपल्या प्रगतीच्या दिशेने पाऊले टाकत आहेत. त्यामुळे राजाराम बंधाऱ्याकडून आपल्या व्यथा सांगितल्या जाण हे स्वाभाविक आहे. तो सांगतो की मी कोणत्याही परिस्थितीत डगमगलो नाही. भर उन्हात वाहनांची ये-जा सहन करत तटस्थपणे उभा राहिलो. पावसाळ्यात तर अनेक दिवस पाण्यात राहिलो. जीव घुटमळत होता पण कधी धीर सोडला नाही. पुराचे पाणी कमी झाले की पुन्हा 16 गावातील ग्रामस्थांच्या सेवेत रुजू होतो. पण आता मला वयाच्या मानाने पहिल्यासारख जमत नाही. शिवाय अनेक वर्षे लोटली पण माझ्याकडे कोणी गांभिर्यानेही पाहिलेले नाही. पूर्वी पावसाळ्यात मी चार-आठ दिवसासाठी पाण्याखाली जायचो. पण हल्ली मानव निर्मित समस्यांमुळे मला 20 ते 25 दिवस पाण्याखाली रहावे लागत आहे. या काळात प्रवाशांची गैरसोय झाल्यानंतर माझ्याकडे सर्वांचे लक्ष गेले.
शासन पातळीवर निर्णय ही झाला की राजाराम बंधाऱ्याला नवसंजीवनी देऊन त्याचं अस्तित्व टिकवायचे झाल्यास समांतर पुल उभारण्याचा. नियोजनानुसार साडे सात मीटर रुंद आणि 192 मीटर लांब समांतर पुल बांधणीच काम सुरू झालं. मग काय मला कोणी पुनरुज्जीवन दिले यावरून आजी-माजी लोकप्रतिनिधीमध्ये श्रेयवाद सुरू झाला. ते पण सहन केलं. काम सुरू होतय असं वाटतंय तोपर्यंत ठेकेदारच पळून गेला. झाली का आता पंचायत. त्यामुळे कामाला ब्रेकही लागला. ते झालं तोपर्यंत मायबाप शेतकरी अडून बसले. त्यांची काय बी चुकी नाही, ते आपली शेती देणार म्हंटल्यावर शेत जमिनीला बाजार भाव मिळायलाच पाहिजे. पण प्रशासन तो द्यायला तयार होईना. गेंड्याच्या कातडीचे ते अधिकारी त्या शेतक्रऱ्यांशी तडजोडीची बातचीत करत नाहीत. पुलाच्या कामाची 24 महिन्यांची मुदत जानेवारी 2019 मध्येच संपली. या सर्व घडामोडीला सात वर्षे झाली पण माझ्या शेजारी समांतर पूल काय झालेला नाही. आता मलाच असं वाटतंय की लोकांना माझी गरज आहे की नाही ? असो मला एवढच सांगायच आहे की प्रशासन आणि लोकप्रतिनिधीनो तुम्ही माझ्या शेजारच्या रखडलेल्या समांतर पुलाचे काम कधीपर्यंत पूर्ण करायचे. शिवाय कोल्हापूर पद्धतीचा जगातील पहिला बंधारा अशी ओळख कायम ठेवायची आहे की कालबाह्य करायची ? हे ही तुम्हीच ठरवा. कारण आता पावसाळा सुऊ झालाय. यात महापूरासारखी स्थिती निर्माण होऊन माझे काही बरेवाईट झाले तर त्याची जबाबदारीही स्वीकारण्याची तयारी ठेवा म्हणजे झालं.









