सिंगापूरच्या ‘टीईएलईओएस-02’, ‘लुमेलाईट-4’ उपग्रहांचे निर्धारित कक्षेत प्रक्षेपण
वृत्तसंस्था/ श्रीहरिकोटा
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) शनिवारी दुपारी 2:19 वाजता पीएसएलव्ही-सी55 रॉकेटद्वारे सिंगापूरच्या दोन उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केले. आंध्रप्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित केलेल्या मोहिमेद्वारे टीईएलईओएस-2 आणि लुमेलाईट-4 हे दोन उपग्रह पृथ्वीच्या निर्धारित कक्षेत यशस्वीपणे पाठविण्यात आले. या मोहिमेत इस्रोचे प्रायोगिक व्यासपीठ ‘पीओईएम’देखील पाठवण्यात आले. ‘पीओईएम’ अवकाशातील निर्वात भागात काही महत्त्वपूर्ण चाचण्या करणार असल्याचे सांगण्यात आले.
‘पीएसएलव्ही’चे हे 57 वे उ•ाण यशस्वी झाल्याने इस्रोने आनंद व्यक्त केला आहे. इस्रोच्या यशस्वी कामगिरीमुळे इतर देशातील उपग्रह अवकाशात पाठविण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचा प्राधान्याने विचार केला जात असल्याचे दिसून येत आहे. इस्रोच्या पीएसएलव्ही-सी55 रॉकेटने शनिवारी सिंगापूरच्या दोन उपग्रहांना घेऊन उ•ाण केले. समर्पित व्यावसायिक मिशन अंतर्गत न्यूस्पेस इंडिया लिमिटेडच्या माध्यमातून ही कामगिरी साकारण्यात आली. ‘पोलर सॅटेलाईट लॉन्च व्हेईकल’द्वारे या उ•ाणसाठी येथील सतीश धवन स्पेस सेंटरमध्ये शुक्रवारपासून 22.5 तासांची उलटी गिनती सुरू झाली होती. मिशन अंतर्गत अंतराळ केंद्रातून 44.4 मीटर उंच रॉकेटने दोन्ही उपग्रहांना घेऊन जाणाऱ्या पहिल्या प्रक्षेपण पॅडवरून उ•ाण करत दोन्ही उपग्रहांना इच्छित कक्षेत ठेवले.
टीईएलईओएस-2
टीईएलईओएस-2 हा सिंगापूरचा दूरसंचार उपग्रह आहे. सिंगापूर सरकारने तेथील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने तो तयार केला आहे. हा उपग्रह दिवस-रात्र आणि कोणत्याही वातावरणात सेवा प्रदान करण्यास सक्षम असेल. त्याचे वजन 741 किलो आहे. या उपग्रहाच्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित माहिती दिली जाणार आहे.
लुमेलाईट-4
लुमेलाईट-4 उपग्रह सिंगापूरच्या इन्फोकॉम रिसर्च इन्स्टिट्यूट आणि नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूरचे सॅटेलाईट टेक्नॉलॉजी अँड रिसर्च सेंटर यांनी संयुक्तपणे तयार केला आहे. सिंगापूरची ई-नेव्हिगेशन सागरी सुरक्षा वाढवणे आणि जागतिक शिपिंग समुदायाला फायदा मिळवून देणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. तो 16 किलो वजनाचा आहे.
‘पीओईएम’ प्लॅटफॉर्म काय आहे?
‘पीओईएम’चे पूर्ण रूप पीएसएलव्ही ऑर्बिटल एक्सपेरिमेंटल मॉड्यूल असे आहे. पीएसएलव्ही हे चार टप्प्यातील रॉकेट आहे. त्याचे तीन टप्पे समुद्रात पडतात. शेवटचा म्हणजेच चौथा टप्पा पीएस-4 म्हणून ओळखला जातो. उपग्रह निर्धारित कक्षेत पोहोचल्यानंतर अवकाशातील कचरा तेथेच राहण्यासाठी आता यावर प्रयोग करण्यासाठी ‘पीओईएम’चा वापर केला जाईल. अशा प्रकारचा प्रयोग आतापर्यंत चारवेळा करण्यात आला आहे.
‘पीएसएलव्ही’ची 57 वी मोहीम
पीएसएलव्ही-सी55 हा प्रक्षेपक इस्रोचा सर्वात विश्वासार्ह रॉकेट राहिला आहे. सप्टेंबर 1993 मध्ये पहिल्यांदा या रॉकेटद्वारे प्रक्षेपण करण्यात आले होते. तेव्हापासून आतापर्यंत 57 वेळा या रॉकेटद्वारे उपग्रह प्रक्षेपित करण्यात आले आहेत. यंदा रॉकेटच्या इंटीग्रेशनमध्ये नवोन्मेष करण्यात आला आहे. रॉकेटच्या असेंबलिंगमध्ये मोठा वेळ लागत होता, यावेळी इंटीग्रेशनमध्ये सुधारणा करत असेंबलिंग आणि उ•ाणात कमी वेळ लागेल याची व्यवस्था करण्यात आली आहे. पूर्वी पीएसएलव्हीच्या सर्व भागांना लाँचपॅडवर मोबाईल सर्व्हिस टॉवरद्वारे जोडले जात होते. नव्या इनोव्हेटिव्ह पद्धतीद्वारे रॉकेटच्या पहिल्या आणि दुसऱ्या स्टेजला पीएसएलव्ही इंटीग्रेशन पॅसिलिटीमध्ये जोडले जाऊ लागले आहे. पीएसएलव्हीने आतापर्यंत 33 देशांचे 297 उपग्रह प्रक्षेपित केले आहेत. हा प्रक्षेपक 44 मीटर उंच असून याचा व्यास 2.8 मीटर इतका आहे. याचे वजन 320 टन असून या रॉकेटचे चार व्हेरियंट्स आहेत.









