इस्रो’शी टाय-अपसाठी अनेक देशांचे प्रयत्न : विक्रम-प्रज्ञानचे चंद्राच्या पृष्ठभागावर ‘प्रयोग’ सुरू
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारताची चांद्रयान-3 मोहीम यशस्वी झाल्यानंतर विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरने चंद्राच्या पृष्ठभागावर उतरून काम सुरू केले आहे. इस्रोने अनेक फोटो आणि व्हिडिओ ट्विट केले आहेत. त्यातून चंद्राबद्दलची माहिती मिळण्याची प्रक्रियाही सुरू झाली असून 14 दिवस प्रज्ञान रोव्हर आणि विक्रम लँडर चंद्रावर विविध प्रयोग करत निरीक्षणे नोंदवणार आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाण्याचा शोध हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. याचदरम्यान जगभरातील अनेक देश भारतीय अवकाश संशोधन केंद्राला (इस्रो) सलाम करत आहेत. जगातील अनेक देशांमध्ये स्वत:ला इस्रोसोबत जोडण्यासाठी स्पर्धा सुरू झाली आहे.
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग करणारा भारत जगातील पहिला देश आहे. भारताच्या या यशाने जगातील अनेक देशांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. इस्रोला चांद्रयान-3 मिशनसाठी फक्त 615 कोटी रूपये खर्च आला. 14 जुलैला हे मिशन लॉन्च झाल्यानंतर 23 ऑगस्टला चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वी लँडिंग करण्यात आले. नासासह जगभरातील अनेक अवकाश संशोधन संस्थांनी या यशासाठी इस्रोचे कौतुक केले आहे. भारत चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा जगातील चौथा देश ठरला. भारताच्या आधी अमेरिका, चीन, आणि सोवियत संघाने अशी कामगिरी केली असली तरी दक्षिण ध्रुवावर पोहोचण्याचा मोठा पराक्रम केल्याने अंतराळ क्षेत्रातील कामगिरीच्या बाबतीत भारताचा नावलौकिक वाढला आहे.
भारत जी-20 चा अध्यक्ष असताना चांद्रयान-3 मोहीम यशस्वी झाल्याने पुढील महिन्यात होणाऱ्या परिषदेदरम्यान आंतरराष्ट्रीय समुदायाकडून भारतावर कौतुकाचा वर्षाव होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. सध्या वेगवेगळ्या भागात यासंबंधी अनेक सेमिनार सुरू आहेत. याचदरम्यान सौदी अरेबियानेसुद्धा एका जी-20 समिटदरम्यान इस्रोसंबंधी चर्चा केली. तसेच कमी खर्चामध्ये यशस्वी मोहीम कशी करायची याचे अध्ययन करण्यासाठी अनेक देश इस्रोशी टाय-अप करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. दक्षिण कोरिया हे अध्ययन करण्यासाठी सर्वात आघाडीवर आहेत. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी या बद्दलची पुष्टी दिली आहे. यशस्वी लँडिंगने अनेक मार्ग मोकळे झालेत. चंद्रावर संशोधन आणि अवकाश संशोधनाच्या अन्य क्षेत्रात भारत जगाच्या मदतीसाठी तयार असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले आहे.
रोव्हर चंद्रावर अर्धा किमी क्षेत्रात फिरणार
इस्रोने गुऊवारी सहा चाकी प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर फिरत असल्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. रोव्हरने चंद्राच्या पृष्ठभागावर येताच प्रथम त्याचे सौर पॅनेल उघडले असून आता सभोवतालचा परिसर न्याहाळण्यासाठी नेव्हिगेशन पॅमेरे सक्रिय केले आहेत. सुमारे अर्धा किलोमीटरचे अंतर हे रोव्हर 12 दिवसात कापणार आहे. यात दोन पेलोड असून ते पाणी आणि इतर मौल्यवान धातू शोधण्यात मदत करतील. ऑर्बिटरवरील हाय-रिझोल्यूशन पॅमेऱ्यातून तेथील छायाचित्रे घेण्यात येत आहेत.









