अध्याय अठ्ठाविसावा
मानवी देह निर्जीव असतो आणि आत्मा निर्गुण असतो, तरीही आत्म्याला भवबंधन कसे लागू होते हे उद्धवाला भगवंत समजावून सांगत आहेत. ते म्हणाले आत्म्याने देहात प्रवेश केला की, तो त्रिगुणांनी वेढला जातो आणि त्याला आपण देहाच्या हालचालींचे केवळ साक्षीदार नसून कर्ते आहोत असा भ्रम होतो. हा सर्व मायेचा खेळ असतो. मुळात संसार वृक्षाला ना शेंडा ना बुडखा पण आत्म्याला झालेल्या भ्रमामुळे त्याला हा संसार वृक्ष नुसताच समूळ वाटत नाही तर त्याला त्याची फळेसुद्धा खुणावू लागतात आणि त्या फळांची त्याला इतकी चटक लागते की, अविवेकाने तो सतत त्या फळांची अपेक्षा करत बसतो. मुळातच ज्याला सत्यत्व नाही, त्याला लागलेली फळे आपल्याला मिळतील की नाही ह्याची तो चिंता करत असतो. आत्म्याला संसारविषयक फलाबद्दल उत्सुकताही वाटत असते पण त्याचबरोबर ती आपल्याला प्रतिकूल तर ठरणार नाहीत ना अशी भीतीही वाटत असते. ज्याप्रमाणे आकाशवेलीची फुले, सशाचं शिंग किंवा वांझेचा पुत्र ह्या सर्व प्रत्यक्षात न येणाऱ्या कल्पना आहेत, त्याप्रमाणे संसारातून भोगफले मिळतील ही अशक्य गोष्ट आहे. तरीपण त्रिगुणांनी वेढल्यामुळे मायेच्या तडाख्यात सापडलेल्या आत्म्याला ते सर्व खरे वाटते. ह्या विषयी स्वत:चे विचार भगवंत आता सविस्तर सांगत आहेत. ते म्हणाले, संसाराला कोणताही सत्यार्थ नसताना त्याला सत्यत्व दिल्याने तो आटोपता आटपत नाही. वांझेचा पुत्र ही कल्पना कधीही सत्यात उतरणार नाही हे जितके खरे तितकेच संसार सत्य आहे असे मानणे चुकीचे आहे. बरे संसार सत्य आहे असे मानावे तर बघता बघता त्याचा नाश होतो आणि सत्य वस्तू तर कधीच नाश पावत नाही. संसार सत्य आहे अशी समजूत अविचारातून दृढ होते तर अविवेकाने म्हणजे चांगलं काय, वाईट काय ह्याकडे दुर्लक्ष केल्याने तो गोडही वाटू लागतो. आत्म्याला त्यातील विषयांचे ध्यान लागते. मी असे करीन, तसे करीन असे संकल्प त्याला खुणावू लागतात. उद्धवा मायेचा चमत्कार पहा, नसलेल्या संसाराचा आभास होऊ लागतो. ज्याप्रमाणे गाढ झोप लागलेली असताना माणसाला वाईट स्वप्न पडते तसेच संसार खरा आहे असे स्वप्न आत्म्याला पडते असं समजलं तरी चालेल. मग त्या अभासातच तो अस्तित्वात नसलेल्या विषयांचे सेवन करतो. जसजसा तो विषयांचे सेवन करू लागतो तसतसे त्याला विषयात अधिकाधिक गोडी वाटू लागते. ते आणखीन आणखीन भोगायला मिळावेत म्हणून तो अगदी वेडापिसा होतो. ह्याचा परिणाम असा होतो की, ह्या विषयसेवनाच्या वाढत्या ध्यासातूनच भवबंधनात अडकतो. नुसताच अडकतो असे नाही तर हे भवबंधन अगदी सुदृढ होऊन त्या बंधनात तो अगदी करकचून बांधला जातो. आता आणखीन एक गंमत सांगतो. ह्या सर्व विषयांच्या गोडीत रमणाऱ्या मंडळीमध्येच अगदी क्वचित एखादा असा असतो की, त्याला सुदैवाने ह्या सर्व मिथ्यत्वाची जाणीव झालेली असते. आता तुला असे वाटेल की, विषयोपभोग निरर्थक आहेत हे पटलेल्या जीवन्मुक्ताला विषयोपभोगांची प्राप्ती झाली की, तोही त्यातच रममाण होत असेल आणि सगळंच मुसळ केरात गेल्याप्रमाणे तो मुक्तीला मुक्त असेल पण असं कधी होत नाही. हे ऐकून तुला आश्चर्य वाटलं असेल ना? आश्चर्य वाटण्यासारखंच आहे हे. ऐक, तुला सविस्तर सांगतो. अज्ञानी मनुष्याने केलेले विषयसेवन आणि ज्ञानी मनुष्याने केलेले विषयसेवन ह्यात फरक येतो. ह्याबाबतीत दोघांचेही अनुभव वेगवेगळे असतात. भगवंतांच्या ह्या सांगण्यावरून उद्धव चकित झाला कारण त्याला वाटत होतं की, एखाद्याला न मिळणाऱ्या गोष्टीचा उपभोग घ्यायला मिळाला तर तो निश्चितच त्यात वहात जात असतो आणि त्यात त्याची पुरती वाट लागते. त्याप्रमाणे विषयापासून दूर गेलेल्या माणसाला जर विषयसेवन करायला मिळालं तर तो निश्चितच मुक्तीपासून दूर जात असेल पण भगवंत तर वेगळंच सांगत होते.
क्रमश:








