प्रणॉय, लक्ष्य सेन, सात्विक-चिराग यांच्या कामगिरीकडे लक्ष
वृत्तसंस्था/ कोपनहेगन
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या 2023 सालातील विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेला येथे सोमवार प्रारंभ होत आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत विविध देशांचे अव्वल बॅडमिंटनपटू सहभागी होत आहेत. एच. एस. प्रणॉय, लक्ष्य सेन तसेच सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांच्याकडून पदकांची अपेक्षा बाळगली जात आहे.
सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीने चालू वर्षीच्या बॅडमिंटन हंगामात आपल्या कामगिरीत सातत्य राखत दुहेरीच्या मानांकनात दुसरे स्थान मिळवले आहे. गेल्या वर्षी झालेल्या या स्पर्धेत सात्विक आणि चिराग या जोडीला पुरुष दुहेरीत कास्यपदकावर समाधान मानावे लागले होते. 1977 साली विश्व चॅम्पियनशिप बॅडमिंटन स्पर्धेला प्रारंभ झाला आणि आतापर्यंत या स्पर्धेत भारताने 13 पदकांची कमाई केली असून त्यात एक सुवर्ण, चार रौप्य आणि आठ कास्यपदकांचा समावेश आहे. 1983 ते 2005 या कालावधीत सदर स्पर्धा प्रत्येक दोन वर्षांनी घेतली गेली. त्यानंतर मात्र ही स्पर्धा प्रत्येक वर्षी नियमितपणे आयोजित केली जात असून ऑलिम्पिक वर्ष हा अपवाद आहे.
या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत भारताचे माजी बॅडमिंटनपटू तसेच विद्यमान बॅडमिंटन प्रशिक्षक प्रकाश पदुकोन यांनी 1983 साली झालेल्या या स्पर्धेत भारताला पहिले कास्यपदक मिळवून दिले होते. भारताची अव्वल महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने या स्पर्धेत 2011 पासून किमान एक पदक सातत्याने मिळवले आहे. 2019 साली सिंधू या स्पर्धेत विजेती ठरली होती. या स्पर्धेमध्ये तिने आतापर्यंत 5 पदके मिळवली आहेत पण बेसिल येथे झालेल्या या स्पर्धेनंतर सिंधूला पदकांपासून वंचित व्हावे लागले आहे. अलीकडच्या कालावधीत पी. व्ही. सिंधू आपला सूर मिळवण्यासाठी झगडत असल्याचे चित्र विविध आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धांमध्ये पाहावयास मिळते. 2021 साली झालेल्या या स्पर्धेत भारताने 2 पदके मिळवली होती. त्यामध्ये एक रौप्य आणि एक कास्यपदकाचा समावेश होता. किदाम्बी श्रीकांत आणि लक्ष्य सेन यांनी ही पदके मिळवली होती. 2022 साली झालेल्या स्पर्धेत सात्विक आणि चिराग या जोडीने दुहेरीचे कास्यपदक पटकावले होते.
2021 आणि 2022 साली झालेल्या या स्पर्धेमध्ये भारताचा एच. एस. प्रणॉय याने एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. यावेळी त्याच्याकडून पदकाची अपेक्षा बाळगली जात आहे. गेल्या वर्षभराच्या कालावधीत लक्ष्य सेनने दर्जेदार कामगिरी केली असून त्याने मलेशिया मास्टर्स स्पर्धा जिंकली तर ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला होता. प्रणॉयचा सोमवारपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत सलामीचा सामना फिनलँडच्या कोलजेनेन बरोबर होणार आहे. 30 वर्षीय लक्ष्य सेनचा सलामीचा सामना जपानच्या निशीमोटोशी होत आहे. महिलांच्या विभागात भारताच्या पी. व्ही. सिंधूला पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली आहे. 2017 आणि 2018 साली सिंधूने या स्पर्धेत रौप्यपदक तर 2013 आणि 2014 साली तिने कास्यपदक मिळवली होती. सिंधूचा या स्पर्धेतील पहिला सामना जपानची ओकुहारा आणि व्हिएतनामची नेग्युयेन यांच्यातील विजयी खेळाडूबरोबर होईल. पुरुष दुहेरीत द्वितीय मानांकित जोडी सात्विक आणि चिराग यांना पहिल्या फेरीत पुढे चाल देण्यात आली आहे. या जोडीने चालू वर्षामध्ये इंडोनेशिया खुल्या, आशिया चॅम्पियनशिप तसेच स्वीस आणि कोरिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धांमध्ये अजिंक्यपदे मिळवली आहेत. महिला दुहेरीत भारताच्या ट्रेसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनाही पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली आहे.









