कोल्हापूर / आशिष आडिवरेकर :
ऐतिहासिक खासबाग मैदानातील कोसळलेल्या संरक्षक (तटबंदी) भिंतीचे काम गेल्या सहा महिन्यापासून बंद पडले आहे. भिंतीच्या कामाचा निधी संपल्याने ठेकेदाराने हे काम अर्ध्यावरच बंद केले आहे. याकामासाठी आणखी निधीची गरज असून, तो मिळाल्यानंतरच काम पूर्ण होणार आहे.
राजर्षी शाहू महाराज यांनी 1912मध्ये आशिया खंडातील एकमेव असे खासबाग कुस्ती मैदान बांधले. मैदानासभोवती शास्त्राsक्त पद्धतीने भक्कम दगडी तटबंदी बांधून आतील बाजूला मातीचा भराव केला. जेणेकरुन मैदानात कुठेही बसून कुस्ती पाहता येईल, अशी रचना केली. बाह्य तटबंदी इतकी विचारपूर्वक आणि शास्त्राrय पद्धतीने बांधली होती की आतील भरावाचा दगडी तटबंदीवर गॅस, हवा पाणी याचा दाब येऊ नये म्हणून प्रत्येक तीन साडेतीन फुटावर छिद्रे (एअर होल) ठेवली होती. परंतू 27 जुलै 2023 रोजी संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यागृहातील एका कार्यक्रमावेळी येथील स्वच्छतागृहाच्या पिछाडीस असणारी तटबंदी अचानक कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला. यानंतर खडबडून जागे झालेल्या महापालिकेने खासबाग मैदानाच्या भिंतींचे स्ट्रक्चरल ऑडीट केले. कोसळलेली भिंत नव्याने बांधण्यासाठी महापालिकेने राज्य शासनाकडे 2 कोटींच्या निधीची मागणी केली. मात्र 48 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला. मार्च 2024 मध्ये भिंतीच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात झाली. यानंतर दोन महिन्यातच भिंतीच्या पायाचे काम पुर्ण झाले. यानंतर पावसाळ्यात हे काम काही दिवस थांबविण्यात आले. मात्र यानंतर हे काम पुन्हा सुरुच झाले नाही.
- 48 लाखांच्या निधीत अर्धीच भिंत
संपूर्ण भिंत नव्याने उभारण्यासाठी 48 लाख रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले होते. मात्र भिंत निम्म्यावर आल्यावरच हा निधी संपला. यामुळे हा निधी संपला कसा असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत अंदाजपत्रकामधील ड्रॉईंगपेक्षा प्रत्यक्ष कामावेळी केलेले काम यामध्ये फरक पडला आहे. जागेवर क्रॉस सेक्शन व इतर तांत्रिक गोष्टी बदलल्यामुळे भिंतीच्या पायासाठी अधीक खर्च झाल्याची माहिती समोर आली आहे.
- खासबाग मैदानाच्या संरक्षक भिंतीची स्थिती
इमारतीवर छोट्या भेगा -100
अतिदुरूस्तीचे ठिकाण-6
मध्यम दुरूस्तीचे ठिकाणे -5
कमी दुरूस्तीची ठिकाणे -10
कोसळलेल्या भिंतीसाठी खर्च – 50 लाख
उर्वरीत भिंतीच्या डागडुजीसाठी खर्च – दीड कोटी
- एका महिलेचा मृत्यू, तरीही प्रशासनास गांभीर्य नाही
27 जुलै 2023 रोजी संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यागृहातील कार्यक्रमावेळी येथील स्वच्छतागृहाच्या पिछाडीस असणारी तटबंदी कोसळून महिलेचा मृत्यू ^झाला होता. तर एक महिला गंभीर जखमी झाली होती. सध्या या भिंतीच्या प्रश्नाबाबत प्रशासन गंभीर नसल्याचे दिसत आहे.
अंदाजपत्रकापेक्षा प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी काही बदल केले आहेत. यामुळे या कामाचा निधी संपला आहे. खासबाग सुशोभिकरणासाठी मंजूर असलेल्या दुसऱ्या निधीतून या भिंतीचे काम करण्यात येणार आहे. उर्वरीत भिंतीच्या कामाचे अंदाजपत्रक तयार करण्याचे काम सुरु असून, लवकरच प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.
नेत्रदिप सरनोबत, शहर अभियंता








