लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे कंत्राटदाराचे फावले : निधी मंजूर करूनही खोळंबा : 2024 पर्यंत कामकाज पूर्ण करण्याचा कालावधी
बेळगाव : टिळकवाडी, तिसरे रेल्वेगेट येथील दुसऱ्या बाजूच्या ओव्हरब्रिजचे काम मागील तीन ते चार महिन्यांपासून ठप्प आहे. ओव्हरब्रिजसाठी कॉलम घालण्यात आले असून उर्वरित काम तसेच पडून आहे. यामुळे परिसरातील नागरिकांचे हाल होत आहेत. रेल्वे अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे तसेच लोकप्रतिनिधींचा धाक न उरल्याने ओव्हरब्रिजचे काम थांबले असल्याची चर्चा रंगू लागली आहे. तिसरे रेल्वेगेट येथे अनगोळ कॉर्नरपासून खानापूर रोडपयर्तिं ओव्हरब्रिज तयार करण्यात आला. मागीलवर्षी या ओव्हरब्रिजचे उद्घाटन झाले. याच ओव्हरब्रिजच्या दुसऱ्या भागाच्या कामाला लवकरच सुरुवात होईल, असे लोकप्रतिनिधींनी सांगितले होते. अनेकवेळा रेल्वेचे अधिकारी तसेच लोकप्रतिनिधींनी ओव्हरब्रिजच्या कामाची पाहणी करून कंत्राटदाराला सूचना केल्या होत्या. परंतु, अद्याप ओव्हरब्रिजचे काम जैसे थे असून रस्ता बंद असल्याने परिसरातील नागरिकांची गैरसोय होत आहे. 12 ऑक्टोबर 2022 रोजी ओव्हरब्रिजच्या कामाला मंजुरी देण्यात आली. यासाठी 27 कोटी 28 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. 2024 पयर्तिं काम पूर्ण करण्याचा कालावधी आहे. परंतु, 2023 वर्ष संपत आले तरी जमिनीलगत कॉलम घालण्याव्यतिरिक्त काम झालेले नाही. काम सुरू असल्याने तिसरे रेल्वेगेट बंद ठेवण्यात आले आहे. तसेच रेल्वेरूळावरून ये-जा होऊ नये यासाठी माती टाकून रस्ता बंद करण्यात आला आहे. परिसरातील नागरिकांना रस्त्याच्या एका बाजूने दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी ओव्हरब्रिजवरून चालत यावे लागत आहे.
कमी प्रतीच्या साहित्याचा वापर…
ओव्हरब्रिजच्या दुसऱ्या बाजूचे काम करताना कमी प्रतीच्या साहित्याचा वापर केला जात असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. सध्या जमिनीलगत घालण्यात आलेल्या कॉलमसाठी कमी जाडीच्या लोखंडी सळ्या वापरण्यात आल्या आहेत. या सळ्यांवर ओव्हरब्रिजचा भार टिकणे अशक्य असल्याने कामाची चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. 2024 ला काम पूर्ण करण्याची अंतिम मुदत असताना अद्याप कॉलमही पूर्ण झालेले नाहीत. त्यामुळे ओव्हरब्रिजचे काम केव्हा पूर्ण होणार? हा प्रश्न अनुत्तरित आहे.









