सर्वच कर्मचारी निवडणूक कामात व्यस्त : अधिकारी-कर्मचारी उपलब्ध नसल्याने समस्या
बेळगाव : विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली नाही. मात्र निवडणुकीच्या तयारीला वेग आला आहे. गेल्या महिन्याभरापासून महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी मनपा कार्यालयात उपलब्ध नाहीत. ईव्हीएम मशीन तपासणी, मतदारयादी तयार करणे अशा विविध कामांची जबाबदारी कर्मचाऱ्यांवर सोपविल्याने निम्मे कार्यालय रिकामी राहत आहे. अलीकडे मनपा कार्यालयात अधिकारी व कर्मचारी उपलब्ध नसल्याने नागरिकांची कामे रखडली आहेत. मार्चअखेरीस महापालिकेकडून घरपट्टी वसुली मोहीम राबविण्यात येते. मात्र आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनपाच्या कर्मचाऱ्यांवर विविध कामांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यापूर्वी हिंडलगा येथील निवडणूक कार्यालयात ईव्हीएम मशीनच्या तपासणीची जबाबदारी मनपाच्या कर्मचाऱ्यांवर सोपविली होती. आचारसंहिता लागू झाल्यानंतर चेकपोस्ट सुरू करून ये-जा करणाऱ्या वाहनांची तपासणी केली जाते. मात्र यावेळी आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार विविध ठिकाणी चेकपोस्ट सुरू करण्यात आले आहेत. तसेच चेकपोस्ट तपासणीसाठी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची व अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. मनपाच्या महसूल विभागातील कर्मचाऱ्यांना चेकपोस्टवर कर्तव्य बजावण्याची सूचना केल्याने महसूल विभागातील बहुतांश अधिकारी व कर्मचारी या कामात व्यस्त आहेत. परिणामी मालमत्ता कर वसुलीचे काम ठप्प झाले आहे.
नागरिकांना विविध कामांसाठी महापालिका कार्यालयात यावे लागते. मात्र महापालिका कार्यालयात अधिकारी व कर्मचारी भेटत नाहीत. निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याचे सांगण्यात येत असल्याने नागरिकांना रिकामी हाती परतावे लागत आहे. सध्या महापालिकेचे बहुतांश अधिकारी व कर्मचारी निवडणूक कामात व्यस्त असल्याने मनपा कार्यालय ओस पडले आहे. काही मोजक्याच कर्मचाऱ्यांकरवी कामकाज सुरू आहे. पण मनपातील कामे रखडल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. अद्याप निवडणूक जाहीर झाली नाही. पण त्यापूर्वीच कर्मचारी निवडणुकीचे कारण सांगून गायब होत असल्याने नागरिकांना कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत. तर निवडणूक जाहीर झाल्यानंतर मतदान प्रक्रिया आणि मतमोजणी होईपर्यंत महापालिकेचे कर्मचारी व अधिकारी कार्यालयात भेटणार नाहीत. निवडणूक संपल्यानंतरच कर्मचारी रुजू होण्याची शक्यता असून दोन महिने नागरिकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.









