कंत्राटदाराचे काम पूर्ण करण्याकडे दुर्लक्ष : शहरवासियांतून नाराजी
प्रतिनिधी /बेळगाव
तिसऱया रेल्वे फाटकावर उड्डाणपुलाची उभारणी करण्यात येत आहे. तीन वर्षे झाली तरी उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले नाही. अंतिम टप्प्यात काम आले असताना कंत्राटदाराने काम पूर्ण करण्याकडे दुर्लक्ष केले आहे. उड्डाणपुलाचे उर्वरित काम पूर्ण करण्याकडे कानाडोळा करण्यात आल्याने शहरवासियांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
काम पूर्ण करण्यास विलंब करणाऱया कंत्राटदारांसह संबंधित खात्याच्या अधिकाऱयांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. कोरोनाच्या प्रसारामुळे उड्डाणपुलाच्या कामात अडथळे निर्माण झाले होते. मात्र कोरोना विषाणूचा प्रसार थांबला असतानादेखील काम पूर्ण करण्याकडे रेल्वे प्रशासन आणि कंत्राटदाराने दुर्लक्ष केले आहे. तिसरे रेल्वेफाटक परिसरात वाहतूक कोंडीची समस्या सातत्याने भेडसावत असते. रेल्वेफाटकामुळे या परिसरात वाहनधारकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे या ठिकाणी रेल्वे उड्डाणपुलाची उभारणी करण्यात येत आहे. पण मागील तीन वर्षांपासून उड्डाणपुलाचे काम सुरू असून अद्यापही अपुरेच आहे. तसेच उड्डाणपुलाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याची तक्रार नागरिक करीत आहेत. पुलावरील डांबरीकरणाचे काम रखडले असून काही ठिकाणी भेगा पडल्याचे निदर्शनास येत आहे. तसेच पावसाचे पाणी उड्डाणपुलावर साचून रहात आहे.
रेल्वे प्रशासनाने दुर्लक्ष
रस्त्याच्या बाजूला पादचाऱयांसाठी पेव्हर्स घालून फुटपाथ बनविण्यात आले आहे. पण हे कामदेखील व्यवस्थित झाले नसल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. हे काम फेबुवारी अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. पण सप्टेंबर उजाडला तरी उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले नाही. रंगरंगोटीचे काम आणि डांबरीकरणाचे काम अपूर्ण आहे. कंत्राटदाराने सध्या हे काम बंद ठेवले असून काम पूर्ण करण्याकडे कानाडोळा केला आहे. उड्डाणपुलाच्या उभारणीमुळे खानापूर रोडच्या एका बाजूचा रस्ता बंद ठेवण्यात आला आहे. अशातच उड्डाणपुलाचे काम संथगतीने सुरू असल्याने वाहनधारकांना अडचणींचे ठरत आहे. हे काम अंतिम टप्प्यात आले असून पूर्ण करण्याकडे रेल्वे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे रेल्वे खाते आणि कंत्राटदाराच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. उड्डाणपुलाच्या उभारणीचे काम पूर्ण करून वाहनधारकांसाठी खुला करावा, अशी मागणी होत आहे.









