कोनवाळ गल्लीतील रहिवाशांना नाहक त्रास : दीड महिना उलटूनही कामाकडे दुर्लक्ष : काम पूर्ण करण्याची मागणी

प्रतिनिधी /बेळगाव
शहरातील डेनेजवाहिन्या तुंबत असल्याच्या तक्रारी वाढल्याने नवीन डेनेजवाहिन्या घालण्याचे काम करण्यात येत आहे. कोनवाळ गल्ली सर्व्हिस रस्त्यावरील डेनेजवाहिन्या बदलण्याचे काम सुरू करून दीड महिना झाला. पण हे काम अर्धवट स्थितीत आहे. त्यामुळे येथील रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.
डेनेजवाहिन्या तुंबल्याने सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही. परिणामी ठिकठिकाणी डेनेज चेंबर ओव्हरफ्लो होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे शहर आणि उपनगरातील तक्रारींचे निरसन करण्यासाठी महापालिकेच्या वतीने डेनेजवाहिन्या बदलण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या अंतर्गत बसवाण गल्ली, देशपांडे गल्ली, अनंतशयन गल्ली, तसेच कोनवाळ गल्ली अशा विविध भागातील डेनेजवाहिन्या घालण्याचे काम हाती घेण्यात आले होते. बसवाण गल्ली येथील ड्रेनेजवाहिन्या बदलण्यात आल्या. तरीदेखील सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही. त्यामुळे याठिकाणी पुन्हा खोदाई सत्र सुरू करण्यात आले आहे.
केवळ डेनेज वाहिन्या घालून ठेवण्यात आल्या आहेत. पण सांडपाण्याचा निचरा होतो की नाही याची पाहणी केली जात नाही. कोनवाळ गल्ली परिसरातील डेनेज समस्यांचे निवारण करण्यासाठी सर्व्हिस रस्त्यावर डेनेजवाहिन्या घालण्याचे काम दीड महिन्यापूर्वी सुरू करण्यात आले होते. डेनेजवाहिन्या घालण्यासाठी रस्ता खोदून ठेवण्यात आला होता. केवळ निम्म्या भागातील डेनेजवाहिन्या घालण्यात आल्या. पण खोदण्यात आलेल्या चरी बुजविण्यात आल्या नाहीत. नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर निम्म्या भागातील चरी बुजविण्यात आल्या आहेत. पण अद्यापही काही ठिकाणी कामे अर्धवट झाली आहेत. याचा फटका रहिवाशांना बसत आहे. डेनेज चेंबरसाठी दीड महिन्यापूर्वी खोदून मातीचे ढिगारे प्रत्येक घरासमोर टाकण्यात आले आहेत. त्यामुळे घरातून बाहेर पडणे मुश्किल झाले आहे.
तसेच दोन्ही बाजूनी माती टाकण्यात आल्याने कचरा जमा करणारे कर्मचारी कचरा घेण्यासाठी येत नाहीत. त्यामुळे येथील नागरिक गटारीमध्ये कचरा टाकत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे घाणीचे साम्राज्य निर्माण होऊन रहिवाशांचे आरोग्य धोक्मयात आले आहे. या परिसरात वृद्ध व महिलांना तसेच लहान मुलांना ये-जा करताना कसरत करावी लागत आहे. रस्त्यावर खेळणारी मुले चरीमध्ये पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. तसेच बुजविण्यात आलेल्या रस्त्यावरील पेव्हर्स व्यवस्थित घालण्यात आले नसल्याने नागरिकांना रस्त्यावरून चालताना अडचणीचा सामना करावा लागत आहे. याबाबत महापालिकेच्या अधिकाऱयांकडे तसेच कंत्राटदाराकडे तक्रार करूनही दखल घेण्यात आली नसल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. येथील समस्यांची पाहणी करून अर्धवट काम पूर्ण करून रस्ता व्यवस्थित करावा, अशी मागणी होत आहे.









