अद्याप सुरुवात न झाल्यामुळे कामांबाबत साशंकता : खासदार विश्वेश्वर हेगडे यांच्या हस्ते ऑक्टोबर महिन्यात झाले होते पूजन
खानापूर : खानापूर-असोगा रस्त्यावरील रेल्वे स्थानकाजवळील फाटकाच्या ठिकाणी होणाऱ्या भुयारी मार्गाचे भूमीपूजन खासदार विश्वेश्वर हेगडे-कागेरी आणि आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या हस्ते 15 ऑक्टोबर 2024 रोजी झाले होते. या भूमीपूजनानंतर तीन महिने उलटले तरी या ठिकाणी प्रत्यक्ष कामाला सुरवात झाली नाही. त्यामुळे भुयारी मार्गाचे काम का रखडले आहे. याबाबत खासदार, आमदार यासह रेल्वे प्रशासनही स्पष्ट माहिती देण्यास टाळाटाळ करत आहे. त्यामुळे भुयारी मार्ग होणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. खानापूर-असोगा मार्गावर रेल्वे स्थानकाच्या जवळून भुयारी मार्ग व्हावा, 1992-93 साली ब्रॉडगेजचे काम हाती घेण्यात आले होते.
तेव्हा भुयारी मार्गाची मागणी केली होती. मात्र रेल्वे प्रशासनाने गेल्या 30 वर्षापासून या त्या कारणाने अनेक तांत्रिक अडचणी पुढे करून ही मागणी फेटाळून लावली होती. गेल्या आठ-नऊ वर्षापासून खानापूर, असोग्यातील काही समाजसेवक तसेच भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी भुयारी मार्गाची मागणी लावून धरली होती. तसेच याबाबत दिल्लीपर्यंत पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला यश आले होते. खासदार निवडणुकीनंतर विश्वेश्वर कागेरी यांनी दिल्लीत रेल्वे मंत्र्याना भेटून असोगा, भुयारी मार्गाला तातडीने मंजुरी देण्याची मागणी केली होती. त्यानुसार या ठिकाणी साडेपाच मीटर लांबीचा भुयारी मार्ग मंजूर झाला. यासाठी 18 कोटी 33 लाखाचा निधीही मंजूर झाला होता. तसेच या भुयारी मार्गाची निविदाही निघाली होती. त्यानंतर भूमीपूजन केले होते.
खासदार-रेल्वे प्रशासनातर्फे माहिती देण्यास टाळाटाळ
त्यावेळी खासदारानी कोणत्याही परिस्थितीत मे 2025 च्या अखेरीपर्यंत या भुयारी मार्गाचे काम पूर्णत्वास जाईल, असे जाहीर केले होते. मात्र तीन महिने उलटले तरी भुयारी मार्गाच्या ठिकाणी कोणत्याही कामास सुरवात झालेली नाही. त्यामुळे नागरिकात संभ्रम निर्माण झाला आहे. याबाबत खासदार विश्वेश्वर हेगडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता खासदारानी याबाबत माहिती देण्यास टाळाटाळ केली आहे. तसेच रेल्वे प्रशासनाकडूनही याबाबत माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. त्यामुळे भुयारी मार्गाचे कामाचे घोडे कोठे आडले आहे. हेच स्पष्ट होत नसल्याने भुयारी मार्ग होणार की नाही, असा संशय निर्माण झालेला आहे. खासदार विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी लगेचच प्रत्यक्ष कामाला सुरवात होईल, असे जाहीर केले होते. त्यांनी आपल्या भाषणात पुन्हा एकदा अधिकृत भूमीपूजन काही दिवसात करण्यात येईल, यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्री आणि इतर मंत्री उपस्थित राहतील, असे जाहीर केले होते. यामुळे 15 ऑक्टोबर रोजी झालेले भूमीपूजन लोकांच्या डोळ्यात धुळफेक करण्यासाठी होते का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. काही नेत्यांच्या वेगवेगळ्या भूमिकेमुळेही या कामात अडथळा निर्माण झाल्याची चर्चा नागरिकांतून होत आहे.
वास्तव जाहीर करणे गरजेचे
खासदार विश्वेश्वर हेगडे यांनी याबाबत रेल्वे प्रशासनाशी संपर्क साधून भुयारी मार्गाबाबत वास्तव जाहीर करणे गरजेचे आहे. अन्यथा गेल्या अनेक वर्षापासून या भुयारी मार्गाबाबत जे सुरू आहे. तेच होईल आणि वेळ मारुन नेण्यात येईल, अशीही चर्चा नागरिकांतून होत आहे.









