भुयारी मार्ग यशस्वी होईल की नाही याबाबत शंका : भुयारी मार्गासाठी 18 कोटी 33 लाखाचा निधी मंजूर, पाणथळ जमिनीमुळे चिंता
खानापूर : खानापूर-असोगा रस्त्यावर रेल्वेस्थानकानजीक भुयारी मार्गाच्या निर्मितीचे काम सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी खोदकाम करून काँक्रीट घालण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र ही जमीन पूर्णपणे पाणथळ असल्याने कंत्राटदाराला या ठिकाणी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. हा भुयारी मार्ग भविष्यात यशस्वी होईल की नाही, अशी शंका आता नागरिकांतून व्यक्त होत आहे. भुयारी मार्गाऐवजी उड्डाणपूल (ओव्हरब्रिज) करणे सोयीस्कर असल्याची प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे. जर हा भुयारी मार्ग अयशस्वी झाल्यास शासनाचे 18 कोटी रुपये पाण्यात जाणार आहेत आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागणार आहे.
खानापूर-असोगा मार्गावर रेल्वेस्थानकानजीक फाटक आहे. रेल्वे प्रशासनाच्या नियोजनानुसार सर्व रेल्वे फाटके बंद करून भुयारी अथवा ओव्हरब्रिज निर्माण करून रेल्वे फाटक बंद करण्यात येत आहे. खानापूर-असोगा मार्गावरील रेल्वे फाटकाच्या ठिकाणी भुयारी मार्ग किंवा उड्डाणपूल करण्यात यावा, अशी मागणी अनेक वर्षापासून होत होती. रेल्वे प्रशासनाने भुयारी मार्ग करण्याचा निर्णय घेतला असून या भुयारी मार्गासाठी रेल्वेस्थानकाच्या नजीकच हा भुयारी मार्ग करण्यात येणार आहे. या भुयारी मार्गासाठी 18 कोटी 33 लाखाचा निधी मंजूर झाला असून साडेपाच मीटर रुंदीचे दोन भुयारी मार्ग करण्यात येणार आहेत. हे भुयारी मार्ग सिमेंट काँक्रीटचे दोन भुयारी मार्ग तयार करून घालण्यात येणार आहेत. यासाठी या ठिकाणी काम सुरू करण्यात आले आहे.
कामात अनेक समस्या
रेल्वेस्थानकाच्या दोन्ही बाजूनी वाहनांना सोयीचे होईल, अशाप्रकारे रस्ता तयार करण्यात येणार असून यासाठी रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी भुयारी मार्गाच्या पातळीवर खोदकाम करण्यात आले आहे. या ठिकाणी सिमेंट काँक्रीट घालण्याचे काम सुरू आहे. मात्र ज्या ठिकाणी भुयारी मार्ग होणार आहे. त्या ठिकाणी रेल्वे रुळाच्या दोन्ही बाजूला पूर्णपणे पाणथळ जमीन असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह कायम असतो. त्यामुळे खोदकाम करून काँक्रीट घालताना कंत्राटदारांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. तसेच अवघ्या शंभर मीटरच्या जवळून पुंभार नाला वाहतो. पावसाळ्यात या नाल्याची फूगही मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे रेल्वे रुळाच्या बाजूला लागून असलेल्या पाणथळ जमिनीत या कुंभार नाल्याचे पाणी येते. रस्ता तयार करण्यासाठी तसेच वाहनांना वाहतुकीसाठी सोयीचे होण्यासाठी रस्त्याची मोठ्या प्रमाणात खोली करण्यात येणार आहे. त्यामुळे पाणथळ जमिनीच्या समांतरापेक्षाही रस्त्याची खोली वाढत असल्याने पावसाळ्यात या भुयारी मार्गात मोठ्या प्रमाणात पाणी साचणार असल्याने हा भुयारी मार्ग पावसाळ्यात वापरता येणार नाही, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे हा भुयारी मार्ग यशस्वी होईल की नाही, अशी शंका आता व्यक्त होत आहे.
भुयारी मार्गाबाबत पुनर्विचार करून उड्डाणपुलाची निर्मिती केल्यास सोयीचे
या भुयारी मार्गाच्या अर्धा कि. मी. पुढे पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या जवळ भुयारी मार्ग निर्माण करण्यात आलेला आहे. पावसाळ्यात या ठिकाणीही मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने या भुयारी मार्गाचा वापर पावसाळ्यात करताना नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. मात्र असोगा भुयारी मार्गावरुन मोठ्या प्रमाणात वाहतूक असल्याने जर या भुयारी मार्गात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यास असोगा, मन्सापूर, भोजगाळी, कुटिन्होनगर यासह मणतुर्गा परिसरातील नागरिकांना रस्ताच बंद होणार आहे. यासाठी रेल्वे प्रशासनाने अद्यापही भुयारी मार्गाबाबत पुनर्विचार करून उड्डाणपुलाची निर्मिती केल्यास सर्वांना सोयीचे होणार असल्याची प्रतिक्रिया असोगा परिसरातील तसेच खानापूर शहरातील नागरिकांतून व्यक्त होत आहे.









