सौम्या ईगूर यांचे प्रतिपादन : एसकेई एम्पॉवर्मेंट चॅरिटेबल फाऊंडेशनतर्फे विद्यार्थ्यांचा गौरव
प्रतिनिधी/ बेळगाव
विद्यार्थ्यांनी केवळ अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय क्षेत्रापुरते मर्यादित न राहता इतर क्षेत्रातही भविष्य घडविण्यासाठी प्रयत्न करावेत. ध्येय निश्चित करून ते गाठण्यासाठी कठोर मेहनत घेतली पाहिजे. एसकेई एम्पॉवर्मेंट चॅरिटेबल फाऊंडेशनकडून मेहनती व गुणवंत विद्यार्थ्यांना कायम प्रोत्साहन देण्यात येते. मुलांना शिष्यवृत्ती देऊन त्यांना उच्च शिक्षणासाठी मदत करण्यात येते. ही बाब खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. एसकेईकडून केवळ आपल्याच कॉलेजमधील विद्यार्थ्यांना नाही तर इतर कॉलेजमधील गुणवंत विद्यार्थ्यांनाही प्रोत्साहन देण्यात येते. हे कौतुकास्पद कार्य आहे, असे प्रतिपादन सौम्या ईगूर यांनी केले.
एसकेई एम्पॉवर्मेंट चॅरिटेबल फाऊंडेशनच्यावतीने आयोजित विद्यार्थी पारितोषिक वितरण सोहळ्यात त्या बोलत होत्या. व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष एस. वाय. प्रभू, मधुकर सामंत, अशोक शानभाग उपस्थित होते. सौम्या म्हणाल्या, एसकेई संस्था इतरांसाठी प्रेरणा असून सर्वांना ऊर्जा देण्याचे कार्य संस्थेकडून होत आहे. हा केवळ पारितोषिक समारंभ नसून गुणवंत विद्यार्थ्यांची समाजाला ओळख करून देणारा हा कार्यक्रम आहे. आपल्या सशस्त्र दलातही युवापिढीला अनेक संधी असून याकडेही त्यांनी लक्ष द्यावे. मुलांनी शिक्षण घेताना आपल्या आरोग्याकडेही लक्ष देऊन सदैव तंदुरुस्त राहिले पाहिजे. मुलांनी शिक्षण व आरोग्याचा समतोल राखला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
आपण कोणत्याही क्षेत्रात काम करा. पण समाजासाठीही आपण सतत कार्यरत राहिले पाहिजे. आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो, या भावनेने मीदेखील राजस्थानमधील दोन मुलींना दत्तक घेऊन त्यांचे भविष्य घडविण्याचे काम करत आहे. पालकांनी आपल्या अपेक्षांचे ओझे मुलांवर लादू नयेत. त्यांना कोणत्या क्षेत्रात भविष्य घडवायचे आहे, यासाठी त्यांना मोकळीक द्यावी. मुलांनी सतत चांगले करत रहावे. ध्येयासाठी प्रयत्नशील रहावे. शिकण्यासाठी वयाची मर्यादा नसून सदैव नवीन गोष्टी शिकण्याची सवय अंगी बाळगावी, असेही त्या म्हणाल्या.
कार्यक्रमाची सुरुवात स्वागतगीताने झाली. शहरातील विविध कॉलेजमधील कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील गुणवंत विद्यार्थ्यांना मानचिन्ह व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. रेणुका दिंडे, महालक्ष्मी कुसगूर, सृष्टी दिगाई, सानिया सनदी या विद्यार्थ्यांनीही मनोगत व्यक्त केले. प्राचार्य एस. एन. देसाई यांनी स्वागत केले. प्रा. किर्ती फडके यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. रेश्मा सपले यांनी आभार मानले. यावेळी शिक्षक, विद्यार्थी, पालक, कर्मचारी उपस्थित होते.









