प्रतिनिधी/ पणजी
राज्यातील अडल्या नडल्या गरीब गरजवंतास मदत करण्याच्या दृष्टीने रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्टचे चाललेले कार्य खरोखरच कौतुकास्पद आणि अभिनंदनीय आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. त्याचबरोबर अशा लोकोपयोगी उपक्रमांसाठी रोटरीस सरकारचे सदैव सर्व सहकार्य आणि पाठिंबा मिळेल, असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले.
सांखळी मतदारसंघातील कुंभारवाडा चावडी पाळी येथे रोटरीतर्फे सुलक्षा शेट या पूरग्रस्त महिलेसाठी बांधलेल्या घराचा ताबा दिल्यानंतर मुख्यमंत्री बोलत होते. व्यासपीठावर त्यांच्यासमवेत रोटरी गव्हर्नर गौरीश धोंड, रोटरी म्हापसा ईलाइटच्या प्रतीक्षा खलप, सदस्य विराज गांवकर, प्रकाश पिळणकर, दिलीप नास्नोडकर, वास्तुतज्ञ अजय सरदेसाई, रोटरीचे समन्वयक सचिन मेणसे, पाळीचे पंचसदस्य संतोष नाईक, आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलताना मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी, जुलै महिन्यात आलेल्या महापूरात अनेकांची घरे कोसळली. कित्येक घरांमध्ये पाणी घुसल्याने त्यांची मोठी नुकसानी झाली. अशा सर्वांसाठी पूराच्या वेळी आणि नंतरही मदतीचा ओघ विविध स्तरांतून झाला होता. त्यात सर्वाधिक योगदान रोटरी इंटरनॅशनलने दिले आहे, असे सांगितले.
या पूरग्रस्तांना सरकाराने दोन लाख रुपये पर्यंत आर्थिक मदत केली आहे. तसेच भाजपाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनीही अन्य प्रकारे मदत केली. या मदतकार्यात आपलाही सहभाग असावा या भावनेतून रोटरीने पुढाकार घेतला व कोसळलेली सर्व घरे पुनः बांधून देण्याची तयारी दर्शविली. त्यातून एक घर पूर्णत्वास आले आहे. त्याचे आज हस्तांतरण होत आहे याबद्दल रोटरी खरोखरच कौतुकास पात्र आहे, असे मुख्यमंत्री पुढे म्हणाले.
एव्हाना ही घरे बांधून पूर्ण झालीही असती, परंतु सरकारी प्रक्रिया व जमीन मालकी यासारख्या विविध समस्या असल्यामुळे त्यात विलंब झाला. मात्र त्या सर्व अडचणींवर मात करून आम्ही आज एका घराचा ताबा संबंधित महिलेस देत आहोत. उर्वरित घरेही लवकरच पूर्णत्वास येतील असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
श्री. गौरीश धोंड यांनी आपल्या भाषणातून रोटरीचे कार्य आणि हाती घेतलेले उपक्रम याबद्दल माहिती दिली. गरीब गरजवंतास मदत करण्यास रोटरी सदैव तत्पर असते. त्याद्वारे मदतीचे काम अखंडित चालू असते. राज्यात पेडणेपासून काणकोणपर्यंत अनेकांना आतापर्यंत विविध प्रकारे मदत करण्यात आली आहे. जुलै महिन्यात आलेल्या पूरात सांखळी मतदारसंघातील अनेकांची घरे कोसळली. त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी रोटरीने पुढाकार घेतला आहे. आज बांधून पूर्ण झालेले घर हे त्याचाच भाग असून त्याचा ताबा संबंधित पूरग्रस्त महिलेस देताना आम्हाला अत्यानंद होत आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
प्रारंभी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याहस्ते घराच्या चाव्या श्रीमती शेट यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सचिन मेणसे यांनी केले. प्रतीक्षा खलप यांनी आभार व्यक्त केले.









