दि. 9 डिसेंबरपर्यंत दावे, हरकती स्वीकारणार
पणजी : भारतीय निवडणूक आयोगाने मतदार याद्यांच्या उजळणीचे काम हाती घेतले असून काल शुक्रवार 27 ऑक्टोबरपासून त्या मतदारांच्या छाननीसाठी उपलब्ध केल्या आहेत. दि. 9 डिसेंबरपर्यंत या याद्या नागरिकांना तपासता येणार आहेत. इच्छुकांना आपल्या मतदारसंघातील स्वत:च्या संबंधित मतदान केंद्रांवर जाऊन या याद्यांची तपासणी करता येणार असून त्यासंबंधी कोणत्याही हरकती, दावे असतील तर सादर करावे, तसेच नावेही समाविष्ट करावी, असे कळविण्यात आले आहे. त्याशिवाय 1 जानेवारी 2024 पर्यंत 18 वर्षे पूर्ण झालेल्या नव मतदारांना स्वत:ची नावनोंदणीही करता येणार आहे. त्यासाठी त्यांनी एक तर निवडणूक आयोगाच्या व्होटर पोर्टलचा वापर करावा किंवा गटस्तरीय अधिकाऱ्याशी संपर्क साधावा असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. अशाप्रकारे अद्ययावत करण्यात आलेल्या मतदार यादीचे दि. 5 जानेवारी 2024 रोजी प्रकाशन करण्यात येणार आहे.









