आणखी दोन-तीन दिवसांचा अवधी लागणार
प्रतिनिधी/ बेळगाव
करंझोळनजीक दरड कोसळल्याने मागील पाच दिवसांपासून लोंढा-वास्को रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे. यामुळे प्रवाशांचे हाल होत असून वास्को येथील प्रवाशांना एकतर कोकण रेल्वे अथवा बसने बेळगाव गाठावे लागत आहे. त्यामुळे हे काम लवकर पूर्ण करावे, अशी मागणी रेल्वे प्रवाशांकडून होत आहे.
कॅसलरॉक ते करंझोळ या रेल्वेस्थानकांच्या दरम्यान मंगळवारी सायंकाळच्या सुमारास दरड कोसळली. मातीचा मोठा ढिगारा रेल्वेमार्गावर कोसळल्याने रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. त्यामुळे वास्को-निजामुद्दीन गोवा एक्स्प्रेस कोकण रेल्वेमार्गे वळवावी लागली. सध्या ही एक्स्प्रेस बेळगावमधून निजामुद्दीनच्या दिशेने धावत आहे.
पाच दिवस रेल्वे कर्मचाऱ्यांकडून मातीचा ढिगारा बाजूला करून रेल्वे ट्रॅकच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. जेसीबीने मातीचा ढिगारा बाजूला काढताना रेल्वे ट्रॅकचेही नुकसान झाले. त्यामुळे काँक्रिटच्या स्लीपर व्यवस्थित बसवून पुन्हा रेल्वेरूळ बसवावा लागत आहे. शुक्रवारपासून पावसाने काहीशी उसंत घेतल्याने रेल्वेमार्गाच्या कामाला गती आली आहे. परंतु, अद्याप दोन ते तीन दिवस रेल्वे वाहतूक बंद राहील, असा अंदाज आहे.
काही रेल्वे रद्द तर काहींच्या मार्गात बदल
दरड कोसळल्याने काही रेल्वे रद्द तर काहींच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. मिरज-कॅसलरॉक व कॅसलरॉक-मिरज एक्स्प्रेस दि. 31 जुलै व 1 ऑगस्ट रोजी बेळगावपर्यंत धावेल. निजामुद्दीन-वास्को एक्स्प्रेस 30 रोजी बेळगावपर्यंत धावेल. तर वास्को-निजामुद्दीन एक्स्प्रेस 31 जुलै, 1 व 2 ऑगस्ट रोजी वास्को ते बेळगाव रद्द करण्यात आली असून बेळगावमधून नियमित वेळेनुसार निघणार आहे. एर्नाकुलम-पुणे एक्स्प्रेस कोकण रेल्वेमार्गे धावणार आहे









