कला व संस्कृती संचालक सगुण वेळीपकडून पाहणी
काणकोण : चावडी, काणकोण या ठिकाणी चालू असलेल्या रवींद्र भवन प्रकल्पाच्या बांधकामाची कला आणि संस्कृती खात्याचे संचालक सगुण वेळीप यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी खात्याचे सांस्कृतिक अधिकारी माटे, प्रीतम नाईक उपस्थित होते. काम सुरू होऊन पाच वर्षांचा कालावधी लोटला, तरी अजूनही प्रकल्प पूर्ण होत नाही अशा प्रकारच्या कित्येक तक्रारी खात्याकडे पोहोचल्या होत्या. त्याअनुषंगाने ही भेट देऊन ठेकेदाराशी चर्चा करण्यात आली. या प्रकल्पाच्या बाजूला असलेल्या आणि एक नाला गेलेल्या जमिनीसंबंधी देखील यावेळी चर्चा करण्यात आली. रवींद्र भवनचे काम त्वरित पूर्ण करावे, अशी ताकीद ठेकेदाराला देण्यात आली. पायाभूत साधनसुविधा महामंडळातर्फे हे काम करण्यात येत आहे. याच प्रकल्पात तालुका वाचनालय सुरू करण्यात येणार असून सध्या हे वाचनालय देवाबाग येथील कोमरपंत समाजाच्या सभागृहात चालू आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर शक्य तितक्या लवकर तालुका वाचनालय या ठिकाणी हलविण्याच्या दृष्टीने लक्ष देण्यात येणार असल्याचे संचालक सगुण वेळीप यांनी स्पष्ट केले.