बसस्थानकाचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार : विनायक मुतगेकर यांनी घेतला आक्षेप
खानापूर : खानापूर येथील नव्याने उभारण्यात येणाऱ्या हायटेक बसस्थानकाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. बसस्थानकाच्या संरक्षक भिंतीचे काम सुरू करण्यात आले होते. यासाठी कॉलम उभारण्यात आले होते. याबाबत विनायक मुतगेकर यांनी आक्षेप घेऊन या संरक्षक भिंतीचे काम थांबवले आहे. यापूर्वीही बसस्थानकाचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार खानापूर तालुका ग्रा. पं. सदस्य संघटनेचे अध्यक्ष विनायक मुतगेकर यांनी वेळोवेळी निदर्शनास आणून देत बांधकामाबाबत आक्षेप घेतला होता खानापूर येथील हायटेक बसस्थानकाचे काम गेल्या वर्षभरपासून सुरू आहे. या बांधकामाबाबत खानापूर तालुका ग्रा. पं. संघटनेचे अध्यक्ष विनायक मुतगेकर यांनी वेळोवेळी आक्षेप घेऊन निकृष्ट बांधकाम थांबवण्यासाठी प्रयत्न करून वरिष्ठांकडे तक्रार करून बांधकाम उत्कृष्ट दर्जाचे होण्यासंदर्भात वेळोवेळी सूचना केल्या होत्या. गेल्या दोन दिवसांपासून बसस्थानकाच्या समोरील बाजूच्या संरक्षक भिंतीचे काम सुरू करण्यात आले आहे. यासाठी जमिनीवरच लोखंडी सळ्यांचे बिम घालून त्यातूनच कॉलम उभारण्यात आले आहेत. त्यामुळे विनायक मुतगेकर यांनी कॉलमसाठी पाया नसताना अधांतरी उभे केल्याने संरक्षक भिंत केंव्हाही कोसळून मोठा अनर्थ होऊ शकतो. यासाठी संरक्षक भिंतीला कॉलमला ख•s मारुन योग्यपद्धतीने कॉलम भरुन ही संरक्षक भिंत उभारण्यात यावी, अशी मागणी करत सुरू असलेले संरक्षक भिंतीचे काम थांबविले आहे. जर कॉलम काढून संरक्षक भिंत उभारण्यात आली नसल्यास आंदोलन करण्याचा इशारा मुतगेकर यांनी दिला आहे.









