वार्ताहर/हलशी
नंदगड येथील खानापूर-हल्याळ रस्त्यावरील बस शेडचे काम गेल्या महिन्याभरापासून अर्धवट स्थितीत ठेवण्यात आले आहे. त्यामुळे प्रवासी, विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. यासाठी ग्राम पंचायतीने अर्धवट स्थितीतील बस शेडचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी होत आहे. माजी आमदार अंजली निंबाळकर यांच्या निधीतून नंदगड येथील खानापूर-हल्याळ रस्त्यावरील नंदगड येथील क्रॉसवर बसशेड उभारण्यात येणार होते. गेल्या वर्षभरापासून हे काम अर्धवट स्थितीत ठेवण्यात आले आहे. गेल्या वर्षभरापासून फक्त पाया भरुन प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला होता. स्थानिक राजकीय हस्तक्षेपामुळे हे काम गेले सहा महिने त्याच अवस्थेत होते. ‘तरुण भारत’ने याबाबत बातमी प्रसिद्ध पेल्यानंतर ग्रा. पं. ने गेल्या महिन्यापूर्वी कंत्राटदाराकडून शेड उभारणी केली आहे. मात्र इतर काम अर्धवट स्थितीत ठेवण्यात आले आहे. तसेच प्रवाशांना बसण्यासाठी आसन व्यवस्था अद्याप उपलब्ध करण्यात आली नाही. त्यामुळे हे बसशेड असून अडचण नसून खोळंबा अशी स्थिती झालेली आहे. ग्रा. पं. ने याबाबत लक्ष घालून कंत्राटदाराकडून उर्वरित काम पूर्ण करून घ्यावे, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.









