‘विश्वासाची ठेव’ हीच संस्थेची खरी कमाई असल्याचे बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांचे गौरवोद्गार
पुणे / प्रतिनिधी :
आर्थिक ठेवी सर्वच आर्थिक संस्थांकडे असतात. मात्र, आजच्या काळात विश्वासाची ठेव अत्यंत महत्त्वाची असून, ‘लोकमान्य’ने लोकांचा विश्वास कमावत यातील आपले वेगळेपण सिद्ध केले आहे. आगामी काळातदेखील हा विश्वास कायम ठेवत संस्थेने राष्ट्रीय स्तरावरही आपल्या कार्याचा विस्तार करावा, अशी अपेक्षा बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी व्यक्त केली.
‘लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटी लि’च्या लॉ कॉलेज रस्त्यावरील स्थलांतरित नवीन प्रधान कार्यालयाचे उद्घाटन राज्यपाल आर्लेकर यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. संस्कृतचे अभ्यासक पं. वसंतराव गाडगीळ, ज्येष्ठ पुरातत्त्वज्ञ आणि मूर्तीशास्त्राचे गाढे अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक डॉ. विद्याधर अनास्कर ‘लोकमान्य’चे संस्थापक-अध्यक्ष किरण ठाकुर, संचालक प्रसाद ठाकुर, पुणे विभागीय प्रमुख सुशील जाधव, मुख्य वित्त अधिकारी वीरसिंह भोसले आदी उपस्थित होते.
आर्लेकर म्हणाले, ‘लोकमान्य’ची वाटचाल मी अतिशय जवळून पाहिली असून, आर्थिक ठेवींच्या पलीकडचे त्यांचे काम आहे. लोकांचा विश्वास हा मिळवावा लागतो. किरण ठाकुर व ‘लोकमान्य’ने लोकांमध्ये जाऊन तो कमावला आहे. कोरोनाच्या कठीण काळातही संस्थेने वैशिष्टय़पूर्ण काम केले. गोव्यातील कामही मी पाहिले आहे. आर्थिक पातळीवर सर्वच काम करतात. मात्र, संस्थेने वैद्यकीय, सामाजिक यांसह विविध क्षेत्रात आपला ठसा उमटविला आहे.
मामांनी विश्वास जिंकला
आम्ही किरण ठाकुर यांना मामा या नावानेच संबोधतो. मामांनी मला नेहमीच स्नेह, प्रेम दिले. त्या प्रेमाखातरच या सोहळय़ाला मी उपस्थित राहिलो आहे. ‘लोकमान्य’च्या प्रधान कार्यालयाचे कामकाज आता या नवीन वास्तूमधून सुरू राहणार आहे. त्याला माझ्या शुभेच्छा आहेत. विश्वासाच्या ठेवीला मरण नसते. पुणेकरांची पावती मिळविणे सोपे नाही. मात्र, मामांनी हा विश्वासही जिंकून दाखविला. आगामी काळातही हा विश्वास कायम रहावा. त्याचबरोबर ‘लोकमान्य’ने राष्ट्रीय स्तरावरही आपले कार्य विस्तारत न्यावे, अशा सदिच्छाही आर्लेकर यांनी दिल्या.
‘लोकमान्य’ एकमेवाद्वितीय : डॉ. देगलूरकर
डॉ. देगलूरकर म्हणाले, ‘लोकमान्य’ हे आर्थिक क्षेत्रातील एकमेवाद्वितीय प्रकरण आहे. 213 शाखांसह संस्था कार्यरत असून, प्रामाणिकपणे व निष्ठेने ठाकुर कुटुंबीयांचे काम सुरू आहे. जनसामान्यांच्या हितासाठी व लोकांच्या योगक्षेमाकरिता काम करणारी दुर्मीळ संस्था म्हणून ‘लोकमान्य’ने आपली ओळख निर्माण केली आहे. किरण ठाकुर यांनी आता थांबू नये. पाय रोवून उभे रहावे.
वसंत गाडगीळ यांनी संस्कृतमधून संस्थेला शुभेच्छा दिल्या. आर्थिक व सामाजिक क्षेत्रात लोकमान्यने केलेले काम अद्वितीय असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.
किरण ठाकुर यांनी प्रास्ताविक केले. संस्थेच्या आजवरच्या वाटचालीचा त्यांनी आढावा घेतला. वित्तीय सहकाराचे नवे रूप सातत्याने सर्वांसमोर मांडणारी ‘लोकमान्य’ संस्था कर्नाटकातून आता पुण्यनगरीत स्थलांतरित झाली आहे. हे सर्व ठेवीदारांचे यश आहे. लोकांचा स्नेह असाच कायम रहावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सुशील जाधव यांनी आभार मानले.








