अडीच कोटी खर्चून कृषी खात्यातर्फे होणार दुरुस्ती
वार्ताहर /माशेल
धारजो कुंडई येथील चिखलपाईण शेती बंधाऱयाचे दुरुस्तीकाम हाती घेण्यात आले असून कृषीमंत्री रवी नाईक यांच्याहस्ते भूमिपुजन करुन या कामाला प्रारंभ करण्यात आला. अंदाजे रु. 2 कोटी 50 लाख खर्चून एक हजार मिटर अंतराच्या या बंधाऱयाची दुरुस्ती करण्यात येणार आहे.
सोमवारी सकाळी झालेल्या या भूमिपुजन सोहळय़ाला स्थानिक आमदार तथा वीजमंत्री सुदिन ढवळीकर, प्रियोळ जिल्हा पंचायत सदस्य दामोदर नाईक, कुंडईचे सरपंच सर्वेश गावडे, पंचसदस्य रुपेश कुंडईकर, कृषी खात्याचे संचालक नेव्हील आल्फोंसो, शेतकरी कुळ संघटनेचे अध्यक्ष विजेश नाईक, सचिव गुरुनाथ नाईक तसेच इतर पंचसदस्य, शेतकरी उपस्थित होते.
यावेळी बोलताना मंत्री रवी नाईक म्हणाले, गोमंतकीयांना आता शेती महत्त्व कळू लागले असून युवावर्गही मोठय़ा प्रमाणात कृषी उत्पादनाकडे वळत आहे. पारंपरिक शेत जमिनी उत्पादनाखाली येण्यासाठी युवावर्गाला प्रोत्साहन दिले पाहिजे. कुंडईतील चिखलपाईण खाजन शेतीवर कित्येक शेतकरी कुटुंबाचे उदयनिर्वाह चालतात. शेतीच्या बंधाऱयाला वारंवार भगदाडे पडून नदीचे खारे पाणी शेतीत घुसत असल्याने शेतकऱयांची मोठय़ाप्रमाणात नुकसानी व्हायची. शेतकरी कुळ संघटनेचे अध्यक्ष विजेश नाईक व इतर शेतकऱयांनी आपली भेट घेऊन ही समस्या मांडली होती. त्यांचा या प्रस्ताव प्राधान्य क्रमाने हाती घेऊन आज बंधाऱयाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होत आहे, असे त्यांनी सांगितले.
मंत्री सुदिन ढवळीकर म्हणाले, कृषी खात्याला योग्य मंत्री लाभले असून कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नरत असतात. संपूर्ण गोव्यातील शेतकऱयांच्या गाठीभेटी घेऊन ते त्यांच्या समस्या जाणून घेतात. कुंडई येथील शेतीचा बंधारा फुटल्याने गेली कित्येक वर्षे शेतकरी अडचणीत होते. आपण त्यांच्या समस्यांकडे बऱयाच वर्षांपासून लक्ष घालीत आलो आहे. आज मंत्री रवी नाईक यांनी कुंडईतील शेतकऱयांची मोठी अडचणी दूर केली आहे. कंत्राटदाराने पावसाळय़ापूर्वी काम पूर्ण करावे. ज्यामुळे पुढील हंगामात पूर्ववत शेतीचे काम जोरात सुरु करता येईल. सरपंच सर्वेश गावडे यांनीही विचार मांडले. विजेश नाईक यांनी आभार मानले.









