कंत्राटदारांच्या अंतर्गत वादाचा प्रवाशांना फटका : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे साफ दुर्लक्ष : पावसाळ्यापूर्वी सदर रस्त्याचे काम पूर्ण होणे अत्यावश्यक : प्रवाशांतून मागणी
खानापूर : बेळगाव-गोवा महामार्गातील खानापूर-रामनगर या रस्त्याचे काम गेल्या महिन्याभरापासून पुन्हा बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीस धोका निर्माण झाला आहे. तसेच या रस्त्याचे काम पुन्हा रखडल्याने यावर्षीही हे काम पूर्ण होणार नसल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे. असे असताना याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने साफ दुर्लक्ष केले आहे. याबाबत ठोस भूमिका घेण्यात येत नसल्याने नागरिकांतून, प्रवाशांतून आणि वाहनचालकांतून संताप व्यक्त होत आहे. बेळगाव-गोवा महामार्गाचे काम गेल्या सहा वर्षांपूर्वी हाती घेण्यात आले होते. यातील बेळगाव-खानापूर हे काम अशोका बिल्डकॉन कंपनीला देण्यात आले होते तर खानापूर ते रामनगर हे प्रकाश बिल्डकॉन कंपनीला देण्यात आले होते. मात्र गेल्या सहा वर्षांपूर्वी काम सुरू झाल्यानंतर पर्यावरणवाद्यांनी याबाबत आक्षेप घेत या कामावर निर्बंध आणले होते. मात्र गेल्या दोन वर्षभरापूर्वी पुन्हा न्यायालयीन प्रक्रियेतून हिरवा कंदील मिळाल्यानंतर या कामाला सुरुवात झाली होती. मात्र प्रकाश बिल्डकॉन यांनी यातून माघार घेतल्याने पुन्हा नव्याने निविदा काढून पुणे येथील एम. व्ही. म्हात्रे यांना या कामाचे कंत्राट देण्यात आले. सुरुवातीपासूनच त्यांच्या कामाची गती पाहता वेळेत काम पूर्ण होणार नाही याबाबत वारंवार तक्रारी झाल्या होत्या. म्हात्रे यांनी तक्रारींकडे दुर्लक्ष करून काम संथगतीने सुरू ठेवले होते. त्यामुळे अनेकवेळा या रस्त्यावर अपघातही झाले होते.
धोकादायक वळणे
गेल्या महिन्यापर्यंत पुन्हा हे काम बंद पडल्याने हे काम वेळेत पूर्ण होणार नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. खानापूर ते रामनगरपर्यंत काही ठिकाणी वळणे आहेत. त्या ठिकाणचा धोका टाळण्यासाठी फलक उभारलेले नसल्याने अनेकवेळा वाहनधारकांचे छोटे-मोठे अपघात होत आहेत. तसेच अनेक दुर्घटनांच्या प्रसंगांना सामोरे जावे लागत आहे. तसेच गुंजी ते वाटरेपर्यंत जवळजवळ 5 किलोमीटरचा एकेरी रस्ता सिमेंटचा करण्यात आला आहे. तर दुसऱ्या बाजूला एक फुटाची संपूर्ण चर निर्माण झाल्याने या ठिकाणी सातत्याने अपघात होत आहेत. यासाठी या ठिकाणी कोणतीही सुरक्षेची साधने किंवा सुरक्षेसाठी उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे वाहतूकदारांना फार मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
कंत्राटदाराकडूनच काम बंद
राष्ट्रीय महामार्गाने हा रस्ता मे महिन्यापर्यंत पूर्ण होण्याचे आश्वासन दिले होते. तसेच याबाबत कंत्राटदारालाही तसे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र कंत्राटदाराने गेल्या महिन्याभरापासून पूर्णपणे काम बंद केल्याने या रस्त्याचे काम पूर्ण रखडले आहे. याबाबत कंत्राटदार म्हात्रे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बोलण्यास नकार दिला आहे. तर राष्ट्रीय महामार्गाचे अभियंते किरण गुब्बनावर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी म्हात्रे यांनी अचानकपणे कोणतीही पूर्वसूचना न देता हे काम महिन्याभरापासून बंद केले आहे. याबाबत त्यांना नोटीस देण्यात आली आहे. म्हात्रे हे आर्थिक अडचणीचे कारण देऊन हे काम बंद पडल्याचे सांगत आहेत. जर त्यांनी वेळेत काम पूर्ण केले नाहीतर त्यांना याबाबत दंडही लावण्यात येणार आहे. जर या कामातून आपले कंत्राट रद्द करण्याची लेखी हमी दिल्यास दुसऱ्या कंत्राटदाराला कंत्राट देवून या रस्त्याचे काम पूर्ण करून घेऊ. मात्र जोपर्यंत त्यांचे कंत्राट आहे. तोपर्यंत आम्हाला काहीही हालचाल करता येत नाही, असे सांगितले. म्हात्रे यांच्यामुळे रस्त्याचे काम रखडल्यास या भागातील प्रवाशांना व रहिवाशांना पुन्हा संकटाला सामोरे जावे लागणार आहे. जर हे काम मे महिन्यापर्यंत पूर्ण झाले नाहीतर पावसाळ्यातही नागरिकांना हाल सोसावे लागणार आहेत. व्ही. एम. म्हात्रे यांनी हे काम ‘यशस्वी इन्फ्रा’ कंपनीच्या कंत्राटदाराला दिले आहे. यशस्वी इन्फ्रॉ आणि व्ही. एम. म्हात्रे यांच्यातील आर्थिक व्यवहारातून हे काम गेल्या महिन्याभरापासून पूर्णपणे बंद पडल्याने हे काम वेळेत पूर्ण होणार नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे प्रवाशांना आणि या भागातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत प्राधिकरणाने कठोर भूमिका घेऊन या रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करणे गरजेचे आहे.
खानापूर-रामनगर रस्त्यावर खबरदारीचा अभाव
खानापूर ते गोवा हद्दीपर्यंत रस्त्यावर अंदाजे 35 वळणे (डायव्हर्शन) देण्यात आलेली आहेत. या ठिकाणी ना फलक ना सूचना, वाहनचालकांना खबरदारी घेण्याच्या सूचना तसेच साधे रिफ्लेक्टर लावून धोक्मयाची सूचना देण्यात आलेली नाही. तसेच ज्या ठिकाणी एकेरी रस्ता तयार केलेले आहेत त्या बाजूने धोका टाळण्यासाठी कोणतीही उपाययोजना केलेली नाही. जर अपघात घडल्यास याची जबाबदारी कोण घेणार, असाही प्र्रश्न प्रवासी वर्गातून विचारला जात आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दखल घेणे आवश्यक
रस्ते महामार्गाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे बेळगाव दौऱ्यावर येत आहेत. त्यांनी गेल्या दहा वर्षापासून रखडलेल्या या रस्त्याच्या कामासंदर्भात जातीनिशी लक्ष घालून या रस्त्याचे काम पूर्णत्वास नेण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी प्रवाशांतून आणि तालुक्यातील नागरिकांतून होत आहे.
गोवा रस्त्याची चाळण
बेळगावपासून खानापूरमार्गे गोव्याला जाण्यासाठी तीन रस्ते आहेत. यात खानापूर व्हाया रामनगर, खानापूर व्हाया हेम्माडगा, जांबोटी-चोर्ला असे रस्ते आहेत. मात्र या तिन्ही रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. चोर्ला रस्त्याचीही दयनिय अवस्था झाली असून गेल्या एक वर्षापासून चोर्ला रस्त्याबाबत मंत्र्यांकडून आणि अधिकाऱ्यांकडून फक्त आश्वासनांची खैरात करण्यात येत आहे. मात्र प्रत्यक्षात या रस्त्याच्या कामास गती देण्यात आलेली नाही. गेल्या दोन वर्षापेक्षाही आता या रस्त्याची पूर्णपणे चाळण झाली असून या रस्त्यावरुन वाहतूक करणे जोखमीचे बनले आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे
हा रस्ता ई. पी. सी. या तत्त्वावर बनत असल्याने राष्ट्रीय रस्ते प्राधिकरणच जबाबदार आहे. मात्र रस्ते प्राधिकरणाचे अधिकारी या रस्त्याबाबत केव्हाच गांभीर्याने घेत नसल्याचे गेल्या पाच वर्षाच्या अनुभवावरुन दिसून येत आहे. त्यामुळे खानापूर ते गोवा हद्दीपर्यंत रस्त्यालगत असलेल्या शंभर गावांचा रहदारीचा प्रश्न निर्माण झाला आहे.









