जिल्हा सत्र न्यायाधीश इनवळ्ळी यांचे प्रतिपादन
बेळगाव : वनांचे संरक्षण करण्यासाठी वन खात्याच्या कर्मचाऱ्यांचे कार्य कौतुकास्पद आहे. तथापि, अन्य काही ठिकाणच्या वन संरक्षणासाठी काही प्रकरणे सोडवायची आहेत, असे बेळगाव जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश टी. एन. इनवळ्ळी यांनी सांगितले. गुरुवारी राष्ट्रीय वन हुतात्मा दिनानिमित्त प्राण गमावलेल्या वन कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, वन कर्मचारी वन्य प्राण्यांचे संरक्षण करण्यासाठी सातत्याने कार्यरत असतात. वन संपत्तीचे रक्षण करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. आपला लोभ आणि वैयक्तिक कारणांमुळे वन संपत्तीचे नुकसान होत आहे. वन कर्मचारी केवळ वन्य प्राण्यांचे रक्षणच नव्हे तर वनक्षेत्राचेही रक्षण करतात. जंगलांचे रक्षण करणे वन आणि पोलीस खात्याची जबाबदारी आहे. वन संपत्तीचे रक्षण करण्यासाठी कठोर परिश्रम करणाऱ्या वन कर्मचाऱ्यांच्या बलिदानाचे स्मरण सर्वांनी करावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी उत्तर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक डॉ. चेतनसिंग राठोड, पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे, जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद, बेळगाव विभागाचे मुख्य वन संरक्षक अधिकारी मंजुनाथ चव्हाण यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.









