गेल्या 6 महिन्यात बालभवनमध्ये अनेक नवे उपक्रम : लॉकडाऊन काळात विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रशिक्षण
प्रतिनिधी /पणजी
बालभवनचे सदस्य सचिव दयानंद चावडीकर यांनी गेल्या 6 महिन्यात बालभवनमध्ये अनेक नवे उपक्रम राबवून बालभवनच्या चळवळीत जान आणली असे म्हणता येईल. उपक्रमशील असलेले चावडीकर यांनी मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि शिक्षकांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी देखील केलेले प्रयत्न वाखाणण्याजोगे आहे.
ऐन लॉकडाउनच्या काळात देखील चावडीकर यांनी ऑनलाईन व्हिडिओद्वारे अभ्यासवर्ग घेण्यासाठी शिक्षक वर्गाला प्रोत्साहन दिले. गोवा विद्यापीठाच्या सहकार्याने हस्तकला, चित्रकला विषयांचे व्हिडिओ तयार करुन ते युटय़ूबद्वारे प्रसारित करुन विद्यार्थ्यांना शिक्षण प्रशिक्षण दिले. कोविड काळात गप्प न बसता सातत्याने विद्यार्थ्यांचा संपर्कात राहाणारी बालभवन संस्था कार्यरत राहिली.
उन्हाळी शिबिरे, गुणदर्शन कार्यक्रम
मुलांमध्ये आपल्या भारतीय संस्कृतीची ओळख व्हावी, जाण व्हावी यासाठी बालभवन केंद्रामधून सरस्वती पूजन, गणेश चतुर्थी, दीपावली, नाताळ, रक्षबंधन आदी विविध सणांवर आधारित कार्यक्रम करण्यास प्रशिक्षकांना चावडीकर यांनी प्रेरणा दिली. एप्रिल, मे महिन्यातील उन्हाळी सुट्टीमध्ये विविध कलांचा आनंद मुलांना मिळावा या उद्देशाने बालभवन केंद्रातर्फे उन्हाळी शिबिर आयोजित केले. 52 केंद्रांमधून 6 हजार विद्यार्थी वर्ग त्यात सहभागी झाले. 30 एप्रिल ते 24 मे या दरम्यान ‘गुणदर्शन – 22’चे 42 कार्यक्रम आयोजित केले. एवढे करुन न राहता ‘अपना घर’मधील मुलांसाठी देखील बालभवनतर्फे उन्हाळी शिबिर घेण्यात आले.
बालभवनतर्फे बालश्री पुरस्कार गोमंत बालभूषण पुरस्कारांचे वितरण कार्यक्रमाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि शिक्षण सचिव रवी धवन (आयएएस) हे देखील उपस्थित होते. वार्षिक आणि नियमित कार्यक्रमा व्यतिरिक्त चावडीकर यांनी बालभवनातील शिक्षकवर्ग तसेच प्रशिक्षिकांसाठी बालकांचे मानसशाळा व आधुनिक शिक्षण पद्धतीची महत्त्वाची सूत्रे याद्वारे एक दिवसीय कार्यशाळेचेही चावडीकर यांनी आयोजन केले व शिक्षकवर्गाने त्याला उदंड प्रतिसादही दिला. नव्या शैक्षणिक तंत्रज्ञानाचा समावेश व्हावा याकरिता ‘आय लाईफ वर्ल्ड’ या संस्थेच्या सहकार्याने कोडिंग प्रोग्राम, आर्टिफिशियल इंटलिजन्स, व्हर्च्युअल रियालिटी अशा प्रकारच्या आधुनिक तंत्रज्ञानाचे आवश्यक ज्ञान बालभवनच्या मुलांना देण्यासाठी बालभवनमध्ये 3 ते 21 वयोगटासाठी लवकरच फ्युचर एज्युटेनमेंट कार्यक्रमाचे वर्ग सुरु करण्याचा संकल्प चावडीकर यांनी सोडलेला आहे.
मुलांना सुसंस्कृत करण्यासाठी बालभवनचा वाटा महत्त्वाचा
बालभवनची चळवळ अधिक सक्रिय करण्यासाठी चावडीकर यांनी विशेष प्रयत्न केलेले दिसले. याशिवाय अनावश्यक खर्चातही कपात केली. या व्यतिरिक्त बालभवन केंद्रातील कर्मचाऱयांचे गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मानधनासंदर्भातील प्रश्न सोडविण्यातही दयानंद चावडीकर यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली. बालभवन ही चळवळ आहे आणि मुलांना सुसंस्कृत घडविण्यासाठी ही केंद्रे महत्त्वाचा वाटा उचलीत असतात. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी चावडीकर यांनी केलेले प्रयत्न मोलाचे ठरले.









