नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय राखीव पोलिसदलाची निष्ठा आणि कार्य यांची प्रशंसा केली आहे. परिस्थिती कितीही कठीण असो, या दलाने नेहमीच प्रत्येक आव्हानाला निडपरणे आणि यशस्वीपणे परतवून लावले आहे. शुक्रवारी या दलाने आपल्या स्थापना दिवस साजरा केला. त्यानिमित्त ते बोलत होते.
केंद्रीय राखीव पोलिस दल ही केंद्र सरकारची संस्था असून ती प्रामुख्याने दहशतवादी आणि फुटीरतावादी संघटनांशी दोन हात करण्यासाठी स्थापन करण्यात आली आहे. भारताची अंतर्गत सुरक्षा सांभाळणे हे देखील या संस्थेचे महत्वाचे काम आहे. ही संस्था 27 जुलै 1939 या दिवशी ब्रिटीशांच्या राजवटीत स्थापन करण्यात आली होती. स्थानिक पोलिसांच्या साहाय्याने नक्षलवादी, माओवादी आणि फुटीरवादी संघटनांचा बंदोबस्त करण्याचे काम या संस्थेने केलेले आहे.
अमित शहा यांच्याकडूनही कौतुक
या दलाच्या स्थापना दिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही या दलाला शुभेच्छा दिल्या असून त्याच्या आजवरच्या कामगिरीची स्तुती केली आहे. देशातील फुटीरतावादाचा कणा मोडण्यात या संस्थेचे योगदान अविस्मरणीय असून कोणत्याही अडचणीवर मात करण्याची या संस्थेची क्षमता आहे. आपले कर्तव्य करत असताना या दलाच्या सैनिकांनी प्राणांचीही पर्वा केलेली नाही. आजवर त्यांनी नेहमीच फुटीरतावाद रोखण्यात यश मिळविले आहे. संस्थेच्या आधुनिकीकरणासाठी सरकार प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन शहा यांनी केले.









