आमदार प्रवीण आर्लेकर यांच्या नेतृत्वाखाली पंचायत मंडळ, ग्रामस्थांची धडक, सरकारने प्रकल्प बंद करण्याची मागणी
पेडणे : दोन खांब धारगळ येथे लोकांच्या वस्ती शेजारी असलेला आर.एम.सी. हा सिमेंट काँक्रीट प्रकल्प उभारण्यास धारगळवासियांनी तीव्र विरोध केला आहे. लोकांचा विरोध लक्षात घेऊन पेडणे मतदारसंघाचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी ग्रामस्थांसह शुक्रवारी सकाळी त्या प्रकल्पावर धडक देऊन प्रकल्पाचे काम बंद पाडले. धारगळ येथे होत असलेला सिमेंट काँक्रिट प्रकल्प हा लोकवस्तीत असून या प्रकल्पामुळे धारगळवासियांना आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक आहे. या प्रकल्पामुळे धूळ प्रदूषण तसेच अन्य आरोग्याच्या समस्या उद्भवणार आहेत. लोकांच्या सुरक्षेचा विचार करून कोणत्याही परिस्थितीत आपण हा प्रकल्प उभारू देणार नाही, असा इशारा यावेळी आमदार प्रवीण आर्लेकर यांच्यासह धारगळ पंचायत मंडळ आणि ग्रामस्थांनी दिला.
पेडणे पोलीस बंदोबस्तात धारगळ येथील लोकांनी आमदार प्रवीण आर्लेकर यांच्या नेतृत्वाखाली दोन खांबाजवळ असलेल्या सिमेंट काँक्रिट प्रकल्पाचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी धडक दिली. धारगळ सरपंच अनिकेत साळगांवकर, पंच भूषण नाईक, पंच सतीश धुमाळ, पंच दाजी शिरोडकर, पंच अर्जुन कांदोळकर, पंच दिलीप वीर, तुकाराम हरमलकर सज्जन कोनाडकर, रोहिदास हरमलकर , नानू हरमलकर , अॅड. मुरारी परब, हनुमंत पिळर्णकर आदीसह नागरिक उपस्थित होते. सदर प्रकल्पाला धारगळ पंचायतीने कुठलाही प्रकारचा ना हरकत दाखला दिलेला नाही. हा प्रकल्प परस्पर पंचायत निवडणुकीच्या कार्यकाळात 2022 मध्ये आचारसंहिता लागू असताना त्यावेळी हा प्रकल्पासाठी पंचायत संचालनालयाकडून ‘ना हरकत’ दाखला घेऊन त्या आधारे पंचायतीला अंधारात ठेवून काम सुरू केले आहे. या कामासाठी स्थानिकांचा वाढता विरोधाची आमदार आर्लेकर यांनी गंभीर दखल घेतली. यावेळी ग्रामस्थांनी आमच्या मुलाबाळांचा तसेच लोकांच्या जीवनाचा प्रश्न आहे आणि आरोग्याच्या दृष्टीने हा प्रकल्प लोकवस्तीत असल्यामुळे नागरिकांना हानिकारक आहे. त्यासाठी सरकारने याची गंभीर दखल घेऊन हा प्रकल्प त्वरित बंद करावा, असा इशारा यावेळी दिला.
सदर सिमेंट काँक्रिट मिक्सिंग प्रकल्प स्थानिकांचा विचार न करता कुठल्याही प्रकारच्या सोपस्कार पूर्ण न करता इथे सुरू झालेला आहे. सरकारी उच्च पातळीवर याला एनओसी व अन्य दाखले जरी घेतले तरी स्थानिक पंचायतीला आणि ग्रामस्थांना अंधारात ठेवून हा प्रकल्प या ठिकाणी उभारलेला आहे. लोकांच्या या प्रकल्पाबाबत तीव्र विरोध असून धुळीचा साम्राज्य तसेच या ठिकाणी येण्राया गाड्या व वाहतूक यामुळे मोठी समस्या निर्माण होणार आहे.
प्रवीण आर्लेकर, आमदार, पेडणे मतदारसंघ.
पंचायतीने कुठल्याही प्रकारचा आम्ही याला दाखला दिलेला नाही. मात्र पंचायतीला आणि स्थानिकांना अंधारात ठेवून हा प्रकल्प इथं जोमाने सुरू आहे. आमदारांकडे लोकांनी वारंवार विनंती करून हा प्रकल्प बंद करावा असा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आमदारांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही धडक दिलेली आहे. सरकारने असा प्रक्लप आमच्यावर लादू नये. आम्ही तो कोणत्याही परिस्थितीत स्वीकारणार नाही.
अनिकेत साळगांवकर, सरपंच, धारगळ.
संचालनालयाकडून घेतली एनओसी : भूषण नाईक
माजी सरपंच तथा विद्यमान पंच भूषण नाईक म्हणाले, 2022मध्ये पंचायतीकडे संबंधित कंपनीने नाहरकत दाखला देण्यासाठी मागणी केली होती. मात्र पंचायत मंडळाने त्यावेळी विरोध केला. आम्ही त्यावेळी लोकांच्या विरोधासाठी एनओसी दिली नाही.पंचायतीला अंधारात ठेवून प्रकल्पाचे काम सुरू केले. तुकाराम हरमलकर, सज्जन कोनाडकर डॉ. योगा हेरंब, अश्वेक नाईक, अॅड. मुरारी परब, रोहिदास हरमलकर, लक्ष्मण गावस आदींनी या प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शविला. अशा प्रकरचा प्रदूषणकारी प्रकल्प आणून लोकांचे आरोग्य धोक्यात घलू नये. हा प्रकल्प कोणत्याही परिस्थित होऊ देणार नाही, असा इशारा सर्वच वक्त्यांनी यावेळी दिला.









