प्रतिनिधी /बेळगाव
भाजीमार्केटचे स्थलांतर एपीएमसीमध्ये झाल्यानंतर ओल्या कचऱ्याची उत्पत्ती मोठ्याप्रमाणात होवू लागली. त्यामुळे एपीएमसीमध्ये 5 टन कचऱ्यापासून वीज निर्मितीचा बायोगॅस प्रकल्प राबविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. पण एपीएमसीमधील भाजीमार्केट गांधीनगर येथे स्थलांतर झाल्याने बायोगॅस प्रकल्प राबविण्याबाबत मनपासमोर पेच निर्माण झाला होता. तरीदेखील याठिकाणी बायोगॅसचे काम सुरू करण्यात आले, मात्र सध्या हे काम रखडले आहे.
ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस प्रकल्पाद्वारे वीज निर्मिती करण्याचा प्रकल्प राबविण्याचा प्रस्ताव तयार केला होता. मात्र जागेअभावी हा प्रकल्प राबविण्यात आला नाही. मात्र पॅन्टोन्मेंट भाजीमार्केटचे स्थलांतर एपीएमसीमध्ये करण्यात आल्यानंतर त्याठिकाणी ओल्या कचऱ्याचे उत्पादन मोठ्याप्रमाणात होवू लागले. दररोज 10 ते 15 टन कचरा तुरमुरी डेपोमध्ये टाकण्यात येत होता. त्यामुळे या ओल्या कचऱ्यापासून वीज निर्मितीचा प्रकल्प राबविण्याचा प्रस्ताव महापालिकेने तयार केला होता. पाच टन कचऱ्यापासून बायोगॅसद्वारे वीज निर्मिती करून उत्पादन होणाऱ्या विजेचा उपयोग एपीएमसीमधील पथदीपांसाठी वापरण्याचा प्रस्ताव तयार केला होता. प्रकल्प उभारण्याकरिता एपीएमसीने जागा उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली होती. त्यामुळे महापालिका प्रशासनाने 15 व्या वित्तआयोगातून दीड कोटीच्या निधीची तरतूद केली होती. तसेच निविदा मागविण्यात आली आहे. भाजी मार्केट परिसरात सदर बायोगॅस प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले होते.
सदर काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. याठिकाणी बायोगॅसकरिता लागणाऱ्या मोठ्या आकाराच्या टाक्मया उभारण्यात आल्या आहेत. तसेच कचरा टाकण्यासाठी आवश्यक असलेले हौद तयार करण्यात आले आहे. सदर काम सुरू करून सहा महिने उलटले. पण अद्याप पूर्ण झाले नाही. नेहरू नगर आणि गोवावेस येथे उभारण्यात आलेले प्रकल्प मार्गी लागले असून याठिकाणी गॅसचे उत्पादन सुरू झाले आहे.
बायोगॅसचे काम अद्याप अपूर्ण
मात्र एपीएमसीमध्ये उभारण्यात येत असलेल्या बायोगॅसचे काम अद्याप अपूर्ण आहे. एपीएमसीमधील बायोगॅस प्रकल्प सुरू झाल्यास दररोज पाच टन कचऱ्याची आवश्यकता आहे. त्यामुळे पाच टन ओला कचऱ्याची विल्हेवाट या प्रकल्पाव्दारे दररोज लागणार आहे. भाजी मार्केटचे स्थलांतर झाल्यामुळे या प्रकल्पाचे काम संथगतीने करण्यात येत आहे.एपीएमसीमधील बायोगॅसचा प्रकल्प महापालिकेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. हा प्रकल्प कधी पूर्ण होणार अशी विचारणा नागरिक करीत आहेत.









