सुरेश जोशी यांचे गौरवोद्गार : कलामहर्षी के. बी. कुलकर्णी जयंती महोत्सवाला प्रारंभ
बेळगाव : केवळ कागदावर रेघोट्या मारल्या तर चित्र तयार होत नाही. चित्रकाराने एखाद्या कृतीवर सारासार विचार करून त्यातून निर्माण झालेली कलाकृती म्हणजे एक अप्रतिम चित्र असते. कलामहर्षी के. बी. कुलकर्णी हे स्वत: पहिला चित्र जगत असत, त्यानंतर ते कागदावर साकारत होते. त्यामुळे चित्र हा केवळ कागदाचा तुकडा नसून तो चित्रकाराच्या काळजाचा तुकडा असतो, हे के. बी. कुलकर्णींनी पदोपदी सिद्ध करून दाखविले, असे गौरवोद्गार देवरुख, जि. रत्नागिरी येथील माजी प्राचार्य सुरेश जोशी यांनी काढले. कलामहर्षी के. बी. कुलकर्णी जयंती महोत्सवाला रविवारपासून येथे प्रारंभ झाला. वरेरकर नाट्या संघाच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे या नात्याने ते बोलत होते. व्यासपीठावर कोल्हापूर येथील चित्रकार जी. एस. माजगावकर, बोधचित्रकार दर्शन चौधरी, जगदीश कुंटे, प्रभाताई कुलकर्णी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वरेरकर नाट्या संघाचे अध्यक्ष किरण ठाकुर होते. ते पुढे म्हणाले, के. बी. कुलकर्णी यांना कलेबद्दल मोठी आस्था होती. चंद्रमे जे अलांच्छन अशी त्यांची ख्याती होती. अनेक ज्ञानशाखांचा संगम त्यांच्या चित्रांमध्ये आढळतो. स्त्राrतत्व हे नवनिर्मितीचे केंद्र आहे,
हे के. बी. कुलकर्णींच्या कलेमधून वेळोवेळी जाणवते. स्त्रियांचा गुदमरलेला श्वास चित्रांमधून दिसून येतो. त्यामुळेच इतक्या वर्षांनंतरही के. बी. कुलकर्णी हे चित्रकलेतील अव्वल नाव ठरल्याचे त्यांनी सांगितले. चित्रकार जी. एस. माजगावकर यांनी के. बी. कुलकर्णी यांच्या आठवणींना उजाळा दिला. आपले विद्यार्थी आपल्यापेक्षाही मोठे व्हावेत, असा कटाक्ष केबींचा होता. त्यांच्या चित्रांमधून एक संस्कार बाहेर पडायचा. चित्रांची कितीही गर्दी असली तरी केबींची कलाकृती ठळकपणे दृष्टीस पडायची. चित्रांमागील संकल्पना समजून घेऊन मगच ते चित्राकडे वळत असत. चित्रांमध्ये आकाराचे सौंदर्य, कलात्मक प्रामाणिकपणा हा केवळ केबींकडेच होता, अशा शब्दात माजगावकर यांनी केबींच्या कार्याचे कौतुक केले. अध्यक्षीय समारोपात किरण ठाकुर यांनी के. बी. कुलकर्णी यांच्या कार्याचा गौरव केला. पृथ्वीतलावर डोळ्यांचे पारणे फिटेल इतके सौंदर्य निसर्गामध्ये आहे. हेच सौंदर्य चित्रकारांनी आपल्या कुंचल्यांतून कागदावर उमटविले. के. बी. कुलकर्णींनी बेळगावसह परिसरातील हजारो विद्यार्थी घडविले. त्यामुळे चित्रकला क्षेत्रात त्यांना मानाचे स्थान असल्याचे ठाकुर यांनी सांगितले.
चित्रकारांचा पुरस्कारांनी सन्मान
मान्यवरांच्या हस्ते कोल्हापूरचे चित्रकार जी. एस. माजगावकर यांना जीवनगौरव तर बेळगावचे बोधचित्रकार दर्शन चौधरी यांना कलागौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर बेळगावलगतच्या जिल्ह्यांमधून घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेतील विजेते रोशन गावडे, कौशिक हेगडे, सेजल चांदीलकर, अनमोल दोडमनी, विजया पाटील, सोनाली पोवार व अभिजित भोसले यांना गौरविण्यात आले. पाहुण्यांचा परिचय श्रुती परांजपे यांनी करून दिला. सूत्रसंचालन वृषाली मराठे यांनी केले. अक्षता कुलकर्णी यांनी आभार मानले.
प्रदर्शनामध्ये 60 चित्रांचा समावेश
के. बी. कुलकर्णी यांच्या जयंतीनिमित्त के. बी. कुलकर्णी आर्ट गॅलरी येथे चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 10 ते सायंकाळी 7 या वेळेत टिळकवाडी येथील वरेरकर नाट्या संघ येथे प्रदर्शन सर्वांसाठी खुले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन रविवारी मान्यवरांच्या हस्ते झाले. प्रदर्शनामध्ये एकूण 60 चित्रांचा समावेश करण्यात आला असून यातील 10 चित्रे दर्शन चौधरी व जी. एस. माजगावकर यांची आहेत. उर्वरित चित्रे चित्रकला स्पर्धेतील विद्यार्थ्यांची आहेत.
यशासाठी संघर्ष करावाच लागेल
कोणतेही ध्येय अथवा यश संपादन करायचे असेल तर जीवनात संघर्ष हा करावाच लागेल, असे सांगत बोधचित्रकार दर्शन चौधरी यांनी आपला जीवनपट उलगडला. घरातून विरोध असतानाही पुणे येथे खडतर पद्धतीने शिक्षण घेतले. कोणाचीही शिफारस अथवा कोणतीही माहिती नसताना मुंबईमध्ये ओनिडासारख्या मोठ्या कंपनीत काम करण्याची संधी मिळाली. परंतु, मुंबईत राहण्याची व्यवस्था नसल्याने सुरुवातीचे काही दिवस मुंबईच्या रेल्वेस्थानकावर काढले. चांगली माणसे भेटल्याने जेथे काम करत होतो, तेथेच राहण्याची संधी मिळाली. त्यामुळे प्रत्येकाला संघर्ष हा करावाच लागतो, असे मार्गदर्शन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.









