अध्याय दुसरा
भगवंत म्हणाले, अर्जुना, मानवी देहात असलेला आत्मा अमर असल्याने देह नष्ट झाला तरी दु:ख वाटून घेऊ नकोस. जर माणसाने निरपेक्षतेने कर्मे केली तर त्याचा पुनर्जन्म होत नसल्याने त्याचा आत्मा मुक्त होतो. ह्यालाच निष्काम कर्मयोग असे म्हणतात. ह्याचे मुख्य तत्व असे आहे की, विशिष्ट फळाची अपेक्षा न करता कर्म केल्यावर जे फळ मिळेल ते गोड मानून घ्यायचं. कोणतेही कर्म करताना मनुष्य आपल्याला अमुक अमुक फळ मिळावे ह्या अपेक्षेने कर्म करू लागला की, तो स्वत:हून पाप किंवा पुण्याचे आचरण करतो. त्या पापपुण्याची फळे भोगण्यासाठी त्याला पुनर्जन्म घ्यावा लागतो. अपेक्षेने कर्म केल्यामुळे माणसाला कर्म बंधनात टाकते. ह्यालाच कर्मबंध असे म्हणतात.
निष्काम कर्म केल्यामुळे कर्माचे बंधन तुटते आणि पुनर्जन्म टळतो हे अनुमान वेद-शास्त्रात मांडले आहे आणि ते सर्वांना मान्य आहे पण हे अनुमान प्रत्यक्षात पडताळून पाहता येत नाही. असे जरी असले तरी निष्काम कर्म केल्याने होणारे दृश्य फायदे भगवंत पुढील श्लोकात सांगत आहेत. ते म्हणाले, निष्काम कर्मामुळे वाट्याला आलेल्या कर्माची वेळेवर सुरवात होते तसेच कर्माला आरंभच न झाल्याने जे नुकसान होणार असते तेही टळते. विशेष म्हणजे याचे थोडे अनुष्ठानही मोठ्या नुकसानीच्या भयापासून रक्षण करते.
न बुडे येथ आरंभ न घडे विपरीत हि । जोडा स्वल्प हि हा धर्म तारी मोठ्या भयातुनी ।। 40 ।।
श्लोकाच्या विवरणात माऊली म्हणतात, भगवंत अर्जुनाला असे म्हणाले की, अपेक्षा पूर्ण होण्याची शक्यता असल्यास वाट्याला आलेले कर्म मनुष्य मनापासून करतो पण अपेक्षा पूर्ण होण्याची शक्यता नसेल तर काहीतरी करून वेळ मारून नेली जाते. ह्यालाच अशुद्ध पध्दतीने केलेले कर्म असे म्हणतात. मात्र निरपेक्षतेमुळे केलेले कर्म यथायोग्य पध्दतीने केले गेल्यामुळे ते शुद्ध असते. शुद्ध कर्म केल्याने ऐहिक सुखांसह मोक्षसुखही मिळते. म्हणून निष्काम कर्म करत रहावे. जसे मंत्र जाणणाऱ्यास भुताची बाधा होत नाही, त्याप्रमाणे फळात आसक्ती न ठेवता कर्म करण्याची सद्बुद्धी निर्माण झाली की, अपेक्षांची बाधा होत नाही. हा निष्काम कर्म केल्याचा पहिला फायदा होय.
दुसरा फायदा म्हणजे कर्मयोगाचे आचरण करणारा इतर काय करत आहेत ह्याकडे पहात न बसता कामाला सुरवात करून टाकतो. इतर काय करत आहेत हे पाहून मग आपण कर्म करू असे म्हणणाऱ्यांच्या कर्माची कधीकधी सुरवातही होत नाही. वेळेत कर्म केल्याने त्यापासून मिळणारे फायदे तर पदरात पडतातच शिवाय तो मोक्षसुखाचाही धनी होतो. कर्मयोगी म्हणतो, आपल्या वाट्याला आलेले कर्म हे ईश्वराच्या इच्छेने आलेले आहे आणि त्याची जशी इच्छा असेल तितक्या प्रमाणात ते पूर्ण होणार आहे. त्यामुळे त्याला कर्म पूर्ण केले म्हणून आनंद किंवा अपूर्ण राहिले म्हणून दु:ख होत नाही. भगवंतानी ह्याच अध्यायाच्या चौदाव्या आणि पंधराव्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे असा कर्मयोगी मोक्ष लाभास योग्य असतो. म्हणून निष्काम कर्म करत रहावे म्हणजे मोक्ष मिळतो.
भगवंत पुढे म्हणाले, सत्वगुणामुळे माणसाला मी शहाणा श्रेष्ठ आहे असे वाटू लागते तर रजोगुणामुळे माझ्या बलावर मी सर्व काही मिळवीन असा गर्व होतो आणि तमोगुणामुळे मी करतोय तेच बरोबर आहे असे तो म्हणत असतो. ह्या तिन्ही गुणांच्या प्रभावामुळे कर्मफलाची अपेक्षा वाढते. ह्या कर्मफलाच्या अपेक्षेवर सद्बुद्धी मात करते.
क्रमश:








