वृत्तसंस्था/ प्रतापगड
उत्तरप्रदेशच्या प्रतापगड जिल्ह्याच्या कुंडा मतदारसंघाचे आमदार आणि जनसत्ता दल लोकतांत्रिकचे अध्यक्ष रघुराज प्रताप सिंह उर्फ राजा भैया यांनी राज्यघटनेतून समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता हे शब्द हटविण्यात यावेत अशी मागणी केली आहे. समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता हे शब्द हटविण्यात आले तरच राज्यघटनेची मूळ भावना कायम राहणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
आमच्या राज्यघटनेची मूळ प्रस्तावना आहे, त्याचे स्वरुप मूळ असावे अशी आमची इच्छा आहे. ज्या विद्वानांना राज्यघटना तयार केली, त्यांनी हे शब्द प्रस्तावनेत सामील केले नव्हते असा दावाही त्यांनी केला आहे.
1976 मध्ये आणीबाणीदरम्यान तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी राज्यघटनेच्या प्रस्तावनेत दुरुस्ती केली होती. इंदिरा गांधी या हुकुमशहा होत्या. आणीबाणीच्या काळात राज्यघटनेच्या मूळ प्रस्तावनेत बदल करण्यात आले. समाजवादी आंदोलन, समाजवादी विचारसरणीच्या डीएनएमध्ये काँग्रेस विरोध आहे. जर राममनोहर लोहिया किंवा आचार्य नरेंद्र देव हयात असते तर त्यांनी काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय कधीच घेतला नसता असे वक्तव्य राजा भैय्या यांनी केले आहे.









