अनोख्या पद्धतीने केली वटपौर्णिमा साजरी : जमलेल्या फळांचे केले गरजूंना वाटप, उपक्रमाचे कौतुक
वार्ताहर /किणये
जन्मोजन्मी हाच पती मिळावा यासाठी शुक्रवारी तालुक्याच्या विविध गावांमध्ये सुवासिनी महिलांनी वटवृक्षाची पूजा करून साकडे घातले व वेगवेगळ्या पद्धतीने वटपौर्णिमा साजरी करण्यात आली. मात्र मच्छे गावातील काही महिलांनी वेगळ्या पद्धतीने वटपौर्णिमा साजरी करण्याचा संकल्प केला आणि त्यानुसार त्यांनी शुक्रवारी दिवसभर गावातील ठिकठिकाणी वटपौर्णिमेनिमित्त ठेवण्यात आलेली फळे एकत्र जमा केले आणि गरजूंना त्याचे वाटप करण्यात आले. मच्छे गावातील तीन ते चार ठिकाणी असलेल्या वडाच्या झाडाची वटपौर्णिमेनिमित्त महिला पूजा करीत होत्या. त्यानंतर वटवृक्षासमोर आंबा, केळी, जांभूळ, धामण, करवंद, पेरू, चिकू आधी रानमेव्यासह विविध प्रकारची फळे ठेवत होत्या. ही ठेवण्यात आलेली फळे विनाकारण वाया जाणार होती. तसेच त्याची नासाडीही होणार होती. त्यामुळेच ही फळे गरजू व भुकेलेल्यांना मिळावी या उद्देशाने गावातील काही महिलांनी फळे जमा केली आणि गरजूंना त्याचे वाटप करून हा अनोखा उपक्रम राबवून एक वेगळा आदर्श समाजासमोर निर्माण केला आहे. समाजात काही पूर्वीपासूनच्या परंपरा जपल्या जातात. ही जमेची बाजू आहे. मात्र अन्नाची नासाडी होणार नाही याची जाणीव ठेवणे गरजेचे आहे. मच्छे गावातील या महिलांनी हा उपक्रम राबवून येणाऱ्या काळात महिलांनी वटपौर्णिमा साजरी करावी. वटपौर्णिमेचे व्रत करावे, वटवृक्षाची पूजा करावी, नैवेद्य म्हणून फळे दाखवावीत, असा संदेशही त्यांनी या माध्यमातून दिला आहे. रेणुका भोमानी लाड, रमा श्याम बेळगावकर, प्रियांका बजरंग धामणेकर, शारदा परशराम कणबरकर, वीणा गजानन छपरे, मालती मालोजी लाड, रेखा जयपाल लाड यांनी हा उपक्रम राबविला आहे. मच्छे व हुंचेनहट्टी परिसरातील गरजूंना या फळाचे वाटप करण्यात आले आहे.









