सातारा :
सदरबझार (सातारा) येथील वृद्ध महिलेच्या घरातून तुळशीची माळ चोरून नेणाऱ्या महिलेला सातारा शहर पोलीस ठाण्याच्या डी. बी पथकाने ताब्यात घेतले आहे. रूपाली विवेक काशीद (वय 34, रा. मंगळवार पेठ सातारा) असे तिचे नाव आहे. रुपाली वृद्ध महिलेच्या घरात स्वयंपाक करण्यास होती.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गेल्या चार वर्षापासून रुपाली काशीद सदरबझार येथे राहत असलेले सागर विठ्ठल लाहोटी यांच्या घरी स्वयंपाक बनवण्याच्या कामास होती. बुधवारी तिने सागर यांच्या आईची नजर चुकवत कपाटातून 2 लाख रूपये किंमतीची सोन्याची तुळशीमाळ चोरून नेली. माळ चोरीला गेल्याचे सागर यांना कळताच त्यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली डी. बी. पथकाने तपासाला सुरुवात केली. यावेळी स्वयंपाक करण्यासाठी आलेल्या रुपालीला ताब्यात घेऊन तिची चौकशी केली. या चौकशीत तिने माळ चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी तिच्याकडून तुळशीमाळ हस्तगत केली आहे.
ही कारवाई पोलीस अधिक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधिक्षक डॉ. वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा विभाग राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शामराव काळे, पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे, पोलीस हवालदार निलेश यादव, सुजीत भोसले, निलेश जाधव, विक्रम माने, पोलीस नाईक पंकज मोहिते, पोलीस कॉन्स्टेबल सुशांत कदम, तुषार भोसले, सचिन रिटे, संतोष घाडगे, सागर गायकवाड, विशाल धुमाळ, मच्छिंद्रनाथ माने, सुहास कदम यांनी केलेली आहे.
…








