प्रतिनिधी मिरज
तालुक्यातील एका गावातील शेत मळ्यात महिलेवर चोरट्यांनी सामुहिक अत्याचार करून ७० हजार रुपयांचा ऐवज लुटला. याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात चार अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसानी दिलेली माहिती अशी की, मिरज तालुक्यातील एका गावात शेत मळ्यात शेतमजुर कुटुंबाचे घरात घुसून चोरी केली. दरम्यान घरात काही नाही अशी विनवणी करणाऱ्या महिलेवर मध्यरात्री सामुहिक अत्याचार केला. यानंतर महिलेच्या गळ्यातील 70 हजार रुपयांचे दागिने चोरून नेत पोबारा केला. चोरीनंतर घराला बाहेरून कडी लावत तिथून पळ काढला. महिलेने आरडाओरडा केला परंतु चोरटे पसार झाले.
दरम्यान या घटनेबाबत मिरज ग्रामीण ठाण्यात तक्रार देण्यात आली. पोलिसांनी घटनेची गांभीर्याने दखल घेत घटनास्थळी धाव घेतली. श्वान पथकासह घटनास्थळी पाहणी केली असता श्वान तिथेच घुटमळले. चौघाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयीतांच्या शोधासाठी पथके तातडीने रवाना करण्यात आली आहेत.








