खेड :
कोकण रेल्वे मार्गावर रेल्वेगाड्यांतून प्रवास करणाऱ्या महिलांचे दागिने लंपास करण्याचे चोरट्यांचे सत्र पुन्हा सुरू झाले आहे. सीएसएमटी–मडगाव एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या तन्वी महेंद्र गावकर (वय 45, रा. कसवन–कणकवली, सिंधुदुर्ग) या महिलेची 2 लाख 19 हजार रुपये किंमतीची दोन सोन्याची मंगळसूत्रे हिसकावत चोरट्यांनी पोबारा केला. ही घटना दिवाणखवटी रेल्वेस्थानकानजीक घडली. बुधवारी सायंकाळी उशिरा येथील पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
गावकर ही 31 मे रोजी 12134 क्रमांकाच्या सीएसएमटी मुंबई–मडगाव एक्स्प्रेसमधील एस 5 डब्यातील 61 क्रमांकाच्या आसनावरून प्रवास करत होती. मध्यरात्री 2.40 वाजण्याच्या सुमारास एक्स्प्रेस दिवाणखवटीनजीक क्रॉसिंगसाठी थांबली होती. याचदरम्यान गावकर झोपल्याची संधी साधत चोरट्याने खिडकीतून त्यांच्या गळ्यातील 30 ग्रॅम वजनाचे व 1 लाख 29 हजार रुपये किंमतीचे तर 12.5 ग्रॅम वजनाचे 90 हजार किंमतीचे मंगळसूत्र हिसकावत पलायन केले. दोन मंगळसूत्रे चोरीस गेल्याचे निदर्शनास येताच गावकर यांना धक्काच बसला. महाड पोलीस ठाणे गाठून त्यांनी तक्रार नोंदवली. त्यानुसार अज्ञात चोरट्यावर बुधवारी सायंकाळच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला. चोरट्यांनी पुन्हा दिवाणखवटी रेल्वेस्थानक ‘टार्गेट’ केले आहे. यापूर्वीही दिवाणखवटीनजीक मंगळसूत्र हिसकावण्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, या चोऱ्यांचा अद्यापही छडा लागलेला नाही. यामुळे प्रवाशांची सुरक्षितता ऐरणीवर आली आहे.
- महिलेची सोनसाखळी लांबवली
सीएसएमटी–मडगाव एक्स्प्रेसच्या एस 5 डब्यातील आसन क्रमांक 68 वरून झोपून प्रवास करणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील 6 ग्रॅम वजनाची आणि 19 हजार रुपये किंमतीची सोनसाखळी चोरट्याने लंपास केली. ही घटनाही दिवाणखवटी रेल्वेस्थानकानजीक घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. यामुळे या ठिकाणी दागिने चोरणारी टोळी कार्यरत असल्याची शक्यता आहे.








