45 हजार रुपयांची भरपाई मिळण्याची होती अपेक्षा : कुणीतरी दिशाभूल केल्याचा पोलिसांचा दावा
वृत्तसंस्था/ चेन्नई
तामिळनाडूत एका महिलेने धावत्या बससमोर उडी घेत आत्महत्या केली आहे. स्वत:च्या मुलाच्या कॉलेजसाठीच्या शुल्काची व्यवस्था करण्याकरता तिने हे कृत्य केले आहे. संबंधित महिला जिल्हाधिकारी कार्यालयात स्वच्छता कर्मचारी होती. दुर्घटनेत मृत्यू झाल्यास कुटुंबाला भरपाईदाखल 45 हजार रुपये मिळतील अशी खोटी माहिती कुणीतरी तिला दिली होती. या खोट्या माहितीला ही महिला बळी पडली आहे.
तामिळनाडूच्या सेलम जिल्ह्dयात ही घटना मागील महिन्यात घडली असली तरी याचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहे. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या महिलेचे नाव पपथि (46 वर्षे) होते. अलिकडेच या महिलेच्या पतीचा मृत्यू झाला होता. या महिलेला एक मुलगा तसेच एक मुलगी आहे. मुलीचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाले आहे. तर मुलगा खासगी महाविद्यालयात शिक्षण घेत आहे.
सेलमच्या अग्रहारम रस्त्यावर भरधाव बसची धडक मिळाल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची प्रारंभिक माहिती मिळाली होती. परंतु सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर आम्हाला ही दुर्घटना नव्हे तर आत्महत्या असल्याचे कळल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
पपथिने त्यापूर्वी अन्य एका बससमोर येण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तेव्हा ती दुचाकीला धडकून कोसळली होती. यानंतर काही वेळातच तिने दुसऱ्या बससमोर येत स्वत:चे जीवन संपविले होते.
नातेवाईकांकडे मागितली होती मदत
पोलिसांनी महिलेचे कुटुंबीय, नातेवाईक आणि शेजाऱ्यांकडे चौकशी केली असता तिला स्वत:च्या मुलाचे कॉलेजचे शुल्क भरण्यासाठी 45 हजार रुपयांची गरज होती असे आढळून आले. पपथिने नातेवाईकांकडे पैशांची मागणी केली होती, परंतु व्यवस्था होऊ शकली नव्हती. जर एखाद्या सफाई कर्मचाऱ्याचा दुर्घटनेत मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला सरकार भरपाई देत असल्याचे पपथिला कळले होते. याच भरपाईच्या अपेक्षेपोटी पपथिने हे टोकाचे पाऊल उचलले आहे.









